आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 08:54 PM2018-05-29T20:54:46+5:302018-05-29T20:56:13+5:30

आजच्या युगात तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यामुळे त्यानुसार स्वत:ला बदलवून ते आत्मसात करण्याची तयारी ठेवा. 

country need to accept modern technology officers : Lephnent General Satish Dua | आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ

Next
ठळक मुद्देएनडीएच्या १३४ व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात, ३३३ छात्रांना पदवी प्रदानवाईनग्लास, डायमंड, क्रॉसओव्हर, सारंग हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा विविध कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधले.  

पुणे : आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. त्यानुसार बदल स्वीकारून हे  नवे तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे. येणाऱ्या काळानुसार स्वत:ला विकसित करीत चांगले अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन संरक्षण विभागाच्या इंटिग्रेटेड स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ मंगळवारी (दि.२९) हबीबुल्ला सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल सतीश दुआ बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडन्ट एअरमार्शल आय. पी. विपीन, रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला उपस्थित होते. 
दुआ म्हणाले, की कुठलाही सैनिक तयार होताना त्याच्या मागे शारीरिक, तसेच नैतिक पैलू असतात. त्याचबरोबर मानसिक पैलू हासुद्धा महत्त्वाचा घटक असतो. तुमचे उद्दिष्ट साध्य करत असताना या सर्व बाबींचा योग्य मेळ घालायला हवा. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. यामुळे कुठलाही निर्णय घेताना योग्य पद्धतीने घ्या. कारण तुमच्या एका निर्णयावर तुमच्यासोबत असलेल्या जवानाचे भवितव्य अवलंबून आहे. एनडीएमध्ये येथील प्रशिक्षक, शिक्षकांकडून तुम्ही शिक्षण घेत असतात. मात्र, यासोबतच तुमचे येथील अनुभवही तुम्हाला शिकवत असतात. आजच्या युगात तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यामुळे त्यानुसार स्वत:ला बदलवून ते आत्मसात करण्याची तयारी ठेवा. 
यावेळी ३३३ छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान शाखेतील ८० विद्यार्थ्यांना, संगणक शाखेतील १९१ विद्यार्थ्यांचा, तर कला शाखेतील ६२ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. यावर्षीचे कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी संगणक शाखेतील नवीन रेड्डी ठरला, तर कमान्डंट सिल्व्हर मेडल आणि चीफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी बी. एस्सीमधील सुरेंद्रसिंग बिष्ट ठरला. कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चीफ आॅफ एअर स्टाफ ट्रॉफी कला शाखेतील प्रजापती मित्तल या कॅडेटला मिळाला. 
यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडन्ट एअरमार्शल आय. पी. विपीन यांनीही मनोगत व्यक्त केले. रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी आभार मानले.
................

सारंग हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके
पदवी प्रदान समारंभापूर्वी एनडीएचे मुख्यालय असलेल्या सुदान ब्लॉकसमोरील प्रांगणात हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर चमूने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. ‘इन्स्पायर्ड थ्रू एक्स्लन्स’ या संकल्पनेवर आधारित या कसरती सादर करण्यात आल्या. हवेतल्या हवेत गिरकी घेणे, अगदी धडक होईल इथपर्यंत एकमेकांजवळ येऊन दूर जाणे अशा अनेक कसरती या प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या या चार हेलिकॉप्टर्सच्या टीमने सादर केल्या. इंडिया, डॉल्फिन लिप्स, डबल अ‍ॅरो क्रॉस, लेव्हल मेश, लेव्हल क्रॉस, पेअर मॅन्युओव्हर्स, वाईनग्लास, डायमंड, क्रॉसओव्हर, हार्ट, सारंग स्प्लीट अशा विविध कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधले.  
........................
लष्कराच्या पॅराकमान्डो फोर्समध्ये जाण्याची इच्छा
एनडीएमध्ये दाखल झालो तेव्हा मनावर खूप दडपण होते. येथील सर्व वातावरण नवीन होते. घरात कुणाचाही लष्कराशी संबंध नव्हता. तरीसुद्धा लष्करामध्ये दाखल व्हायचे होते. भविष्यात लष्कराची पॅराकमान्डो फोर्समध्ये जाण्याची इच्छा आहे, अशी मनीषा कमान्डंट सिल्व्हर मेडल आणि चीफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी बी. एस्सीमधील सुरेंद्रसिंग बिष्ट याने व्यक्त केली. सुरेंद्रसिंग बिष्ट  मूळचा उत्तराखंड राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. 
सुरेंद्र म्हणाला, की लहानपणापासूनच लष्करात भरती व्हावे, अशी इच्छा होती. यासाठी एनडीएमध्ये शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार मी परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नत्त मी एनडीएची परीक्षा पास केली. ज्यावेळी मी एनडीएत दाखल झालो तेव्हा मनावर खूप दडपण होते. सर्व परिसर नवीन होता. मात्र, काही दिवसांतच येथे रुळलो. एनडीएचे प्रशिक्षण झाल्यानंतर लष्कर शाखेचा विद्यार्थी असल्याने आता डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेणार आहे. भविष्यात लष्कराच्या पॅराकमांडो फोर्समध्ये जाण्याची इच्छा आहे. सुरेंद्रचे वडील एका खासगी कंपनीत कामाला असून त्याची आई घर सांभाळते. 
---------
‘फायटर पायलट बनून देशाची सेवा करायची आहे’
लहानपणापासून मला विमानांचे आकर्षण होते. यामुळे मोठे होऊन फायटर पायलट व्हायचे, हे मनाशी पक्के ठरवले होते. वडील लष्करात असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. त्यांनी एनडीएमध्ये दाखल होण्यासाठी मला प्रेरित केले. आजचा क्षण खूप आनंदाचा आहे. भविष्यात फायटर पायलट बनून देशाची सेवा करायची आहे, अशी भावना कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी हा नवीन रेड्डी याने व्यक्त केली. नवीन हा मूळचा आंध्र प्रदेश येथील असून त्याचे शिक्षण कोरकोंडा येथील सैनिक स्कूल येथे झाले आहे. 
नवीन म्हणाला, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षे खूप छान गेले. माझा कठोर परिश्रमावर विश्वास आहे. आज मिळालेले मेडल ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खासकरून आई-वडिलांसमोर माझा झालेला सन्मान हे माझे भाग्य आहे. आकाशात उडणारी विमाने पाहिल्यानंतर या विमानांसारखे उडायचे, असे सारखे वाटायचे. यामुळे मी फायटर पायलट बनण्याचे ठरवले. त्यानुसार एनडीएची तयारी केली. कठोर परिश्रमामुळे पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो. तीन वर्षे खूप कठीण होते. पण मी येथील प्रत्येक क्षण आनंदाने जगलो. यासाठी मला माझ्या आई-वडिलांनी नेहमी प्रोत्साहित केले. एअरफोर्स कॅडेट असल्यामुळे मला भविष्यात फायटर पायलट व्हायचे आहे. त्यातून मला देशाची सेवा करायची आहे, असेही नवीन म्हणाला. 
-----
मित्र आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य 

लष्करात यावे, असे काही ठरवले नव्हते मात्र मित्रांनी प्रोत्साहित केल्यामुळे मी एनडीएची सर्वात कठीण अशी परीक्षा पास होऊ शकलो, अशा भावना कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चीफ आॅफ एअरस्टाफ ट्रॉफीचा विजेता प्रजापती मित्तल याने व्यक्त केली. मित्तल हा मूळचा मुंबईचा असून अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील टेलर असून कुठलीही लष्करी पार्श्वभूमी नसताना त्याने हे यश मिळवले. 
प्रजापती म्हणाला, की आजचा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील सर्वात मोठ्या ट्रॉफीने मी सन्मानित झालो आहे. लष्करात येण्यासाठी माझ्या मित्रांनी मला खूप पाठिंबा दिला. कुठलेही क्लास न लावता स्वत:च्या बळावर अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो. वडिलांचा छोटा व्यवसाय असला तरी त्यांनी मला या क्षेत्रात येण्याविषयी रोखले नाही. एनडीएतील सुरुवातीचा काळ खूप कठीण गेला. कारण सर्व गोष्टी नवीन होत्या. या ठिकाणी येणाºया प्रत्येकाला यातून जावे लागते. एक वर्ष झाल्यानंतर येथील गोष्टी समजायला लागतात. मी लष्करी शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे मी लष्करातच करिअर करणार. कुठल्या स्ट्रीममध्ये जायचे हे अद्याप ठरवलेले नाही. पुढचे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी झाल्यानंतर काय करायचे हे ठरवणार आहे. 
..............             

Web Title: country need to accept modern technology officers : Lephnent General Satish Dua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.