देश ‘सहिष्णू’ नव्हे; ‘असहिष्णूच’!, ज्येष्ठ दिग्दशिका सई परांजपे यांनी मांडले परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:59 AM2020-12-22T04:59:00+5:302020-12-22T04:59:27+5:30
Sai Paranjape : सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे.
पुणे : आजच्या काळात ‘ग्लोबल इंडिया’ ही संकल्पना नाकारली जात आहे. आपण एकता, बंधुता, एक देश-एक राष्ट्र या सर्वांचाच अर्थ विसरून चाललो आहेत. या संकल्पनेचा व्यापक विचार न करता संकुचित विचासरणीकडे झुकत आहोत. कितीही सहिष्णू आहोत असे भासवले जात असले तरी, प्रत्यक्षात देश असहिष्णू झाला आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते न पटणारे आहे, असे परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांनी व्यक्त केले.
सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने या पुस्तकावर ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. नाटक, दूरदर्शन, चित्रपट अशा माध्यमांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांच्याशी लतिका पाडगावकर यांनी संवाद साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार कुमार केतकर, उपेंद्र दीक्षित, डॉ. विद्या केळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य उपस्थित होते.
सई परांजपे यांचे वडील रशियन आणि आई शकुंतला मराठी. धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र विचारसरणी अशा सर्वार्थानेच या कुटुंबाला एक ‘ग्लोबल’ ओळख मिळाली. अशा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सई परांजपे यांना ही संकल्पना आज देशातून नाकारली जात आहे का? असे विचारले असता त्यांनी याचे उत्तर ‘दुर्दैवाने, हो’ असे दिले.
दिल मांगे मोअर...
सई परांजपे यांनी चित्रपट व्यवसायातील पुरुषी वर्चस्वाला छेद देत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ८१ वर्षांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला त्यांचा हा कलात्मक प्रवास शंभरीपर्यंत जावो हीच सदिच्छा आहे. लोकांना त्यांनी कलात्मक प्रवासात खूप भरभरून दिले आहे. पण ‘दिल मांगे मोअर’! अशी मिस्कील टिपण्णी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केली.