अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा

By admin | Published: February 28, 2017 01:34 AM2017-02-28T01:34:36+5:302017-02-28T06:02:29+5:30

प्रवाह कशाचाही असो, तो नेहमी अखंड आणि अविरतपणे वाहत असतो

The country should be 'science-oriented' | अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा

अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा

Next

-डॉ. अनिल लचके
प्रवाह कशाचाही असो, तो नेहमी अखंड आणि अविरतपणे वाहत असतो. त्याला गती आणि सातत्य असतं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रवाह असाच; पण वेगवान असतो. अनेक शाखा-उपशाखांचे प्रवाह त्याला येऊन मिळत असतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर जिथं विज्ञानाचा उपयोग झालेला नाही, असं एकही क्षेत्र सांगता येणार नाही. परिणामी सामान्य माणसांच्या जीवनात त्याचे केवळ पडसादच नाही तर ठसे उमटलेले आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढवणे आणि त्याचे जीवनमान सुखसंपन्न करणे हेच तर विज्ञानाकडून अपेक्षित आहे. पंडित नेहरू द्रष्टे होते. त्यांनी मोठ्या उमेदीने देशाच्या कानाकोपऱ्यांत विविध प्रयोगशाळांची ‘ज्ञान-मंदिरे’ उभारली. विज्ञान-तंत्रज्ञानाचा फायदा थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हीच त्यामागे भूमिका होती.  प्रगतीची थक्क करणारी भरारी आज आपला देश अणुतंत्रज्ञानात; म्हणजे अणुशक्तीची निर्मिती करण्यास सज्ज झाला आहे. अपारंपरिक ऊर्जा उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. काही वर्षांनी ऊर्जेचे अतिरिक्त उत्पादन होईल. औद्योगिक क्षेत्राला त्याचा लाभ होईल.
भारताने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी १०४ उपग्रह पीएसएलव्हीमार्फत तंतोतंत नियोजित कक्षेत सोडून आपले अवकाश तंत्रज्ञानातील प्रभुत्व सिद्ध केलंय. यात एकट्या अमेरिकेचे ९६ उपग्रह होते! अनेक उपग्रह आयआयटी (कानपूर) आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथिर्नींनी घडवलेले आहेत. उपग्रहांची नावेही देशी आहेत- स्वयं, सत्यभामा, जुगुनू वगैरे. परकीय देशांचे १८० उपग्रह भारताने अंतरिक्षात सोडून अंतराळातील बाजारपेठ काबीज केली आहे. अशा यशस्वी वैज्ञानिक प्रकल्पांमुळे नागरिकांची अस्मिता, आत्मविश्वास आणि अभिमान जागृत झालाय. एकंदरीत पाहिलं तर विज्ञान आणि समाज याची फारकत होण्याची शक्यता नाही! २८ फेब्रुवारीच्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रगतीच्या पडद्यामागच्या संशोधकांची आठवण होते आणि ही भावना सुखदायी आहे.
चीन, पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी १०४ उपग्रह सोडणाऱ्या पीएसएलव्ही मोहिमेचे मनोमन कौतुक केलेले आहे. जर भौतिकीशास्त्राचा पाया मजबूत असेल तरच १०४ उपग्रह एकामागोमाग एक (न धडकता) विशिष्ट कोनातून अचूकपणे ‘लॉन्च’ करता येतात. नंतर ते आपाआपल्या कक्षेत भ्रमण करू लागतात. म्हणूनच भारतीय तंत्रज्ञांनी आपले कौशल्य सिद्ध केलंय, असं चीनचे जाणकार म्हणतात.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: The country should be 'science-oriented'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.