देश अडचणीत; सोनियांचा पुढाकार त्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:41+5:302021-08-21T04:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांंना एकत्र करत आहोत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आलेल्या पटोले यांनी पक्षाच्या दिवसभराच्या कार्यक्रमांनंतर पत्रकारांबरोबर काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला.
पटोले म्हणाले, दिल्लीत शेतकरी अनेक महिने आंदोलन करत आहेत, इंधनाचे दर आकाशाला भिडले, बेरोजगारी वाढत आहे व देशाचे पंतप्रधान यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. संपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे, काँग्रेसच्या काळात शांतता होती, आता अशांतता आहे.
भाजप म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र अशी टीका करून पटोले म्हणाले, त्यांच्याच पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मागील ७ वर्षात स्वीस बँकेतील संपत्ती ३०० पट वाढल्याचे म्हटले आहे. पुण्यात प्राईम लोकेशनच्या जागा विकायला काढल्या. यांचा स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडतो. वरपासून खालपर्य़ंत तिथे हेच सुरू आहे. हे मर्यादा ओलांडणारे लोक आहेत, आता देशातील जनताच त्यांना बरखास्त करेल.
पक्षाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक बसवराज पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.