प्रजासत्ताकदिनी सुरू होणार देशातील पहिले शाळेचे रेडिओ केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:47+5:302021-01-25T04:12:47+5:30

पुणे : सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विज्ञान भारती ...

The country's first school radio station will be launched on Republic Day | प्रजासत्ताकदिनी सुरू होणार देशातील पहिले शाळेचे रेडिओ केंद्र

प्रजासत्ताकदिनी सुरू होणार देशातील पहिले शाळेचे रेडिओ केंद्र

Next

पुणे : सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेने सुरू केलेले देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहायक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘मएसो सुबोधवाणी’मुळे प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओ तंत्रज्ञानामुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार असून एकाच वेळी दहा हजार श्रोते त्याचे कार्यक्रम इंटरनेटद्वारे ऐकू शकतील. त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे.

या उपक्रमाविषयी सुधीर गाडे म्हणाले, “सध्याच्या शिक्षणातील ‘घोका आणि ओका’ ही पद्धत दूर सारून भविष्यातील सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम ‘मएसो सुबोधवाणी’ केंद्रावर सादर करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने संस्थेच्या गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे आगळ्यावेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी एक तास प्रसारण करण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या या केंद्राचे प्रायोगिक सादरीकरण सुरू आहे.”

———————————

सर्जनशील विचारांना चालना

विज्ञान भारतीचे या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्थेचे विलास रबडे यांनी सांगितले की, इ. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम मएसो सुबोधवाणी केंद्रावर सादर केले जातील. सर्जनशील व कल्पक विचारांना प्रवृत्त करणारा कंटेंट हे ‘मएसो सुबोधवाणी’चे वैशिष्ट्य असेल. शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली जाईल.

——————-

Web Title: The country's first school radio station will be launched on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.