देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी
By admin | Published: May 18, 2017 11:26 PM2017-05-18T23:26:15+5:302017-05-18T23:26:15+5:30
देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली. सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले.तब्बल ९ तास ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया चालली होती. डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखालील १२ निष्णात डॉक्टरांच्या टीमने हे प्रत्यारोपण यशस्वी केले.
याबाबत डॉ. मिलिंद तेलंग म्हणाले, ‘आदल्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आईच्या शरीरातून गर्भाशय काढण्यासाठी सुमारे ४ तासांचा कालावधी लागला. त्यानंतर गर्भाशय रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. गर्भाशयदाती आणि प्रत्यारोपण करण्यात आलेली रुग्ण सुखरुप आहे. रुग्णाला २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.’
या कुटुंबातील चार बहिणींमध्ये या मुलीला जन्मापासूनच गर्भाशय नव्हते. त्यामुळे आईनेच तिच्यासाठी गर्भाशय देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, भारतामध्ये या शस्त्रक्रियेची सुविधा नव्हती. गॅलक्सी हॉस्पीटलच्या डॉ. पुणतांबेकर यांनी देशातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान घेतले. या मुलीच्या आईचेच गर्भाशय तिच्यामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. नियमित औषधोपचारांबरोबरच या महिलेची च मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गर्भाशयदातीचा गर्भाशय काढण्यासाठी ४ तास व त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी चार तास लागले, अशी माहितीही डॉ. तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया स्वीडनमध्ये २०१४ मध्ये करण्यात आली आहे़ आतापर्यंत जगात केवळ २५ शस्त्रक्रिया झाल्या असून त्यापैकी १० शस्त्रक्रियांनंतर महिला गर्भवती होऊ शकल्या आहेत़ गेल्या १४ वर्षांपासून गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्या असून जगातील ४० देशात पुणे टेक्नीक म्हणून हे तंत्रज्ञान ओळखले जाते़ आत्तापर्यंत गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या होत्या. मात्र, तोच गर्भाशय काढून इतर व्यक्तीला कोणतीही चूक न करता नव्याने बसवणे हे दिव्य डॉक्टरांना पार पाडावे लागणार होते. प्रत्यारोपण पार पडल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ज्या महिलांना जन्मत:च गर्भाशयाची पिशवी नसते किंवा गर्भाशयाची पिशवी असूनही ती निकामी झालेली असते अथवा कॅन्सरमुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ आलेली असते, अशा महिलांना पुत्रप्राप्तीसाठी गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे़ यामध्ये मुलीला तिच्या आई किंवा बहिणीकडूनच गर्भाशय मिळू शकते़ त्यादृष्टीने दाता आई व मुलीच्या डीएनए स्टेट करुन सर्व कायदेशीर बाबी ससून रुग्णालयामार्फत पूर्ण करण्यात आल्या.
मातृत्वाचा मार्ग होईल मोकळा-
जन्मत:च गर्भाशय नसलेल्या किंवा काही कारणामुळे गर्भाशय काढून टाकावे लागणाºया महिलांना मातृत्वाचा आनंद मिळू शकत नाही. परंतु, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. मात्र,आई किंवा बहिणच गर्भाशय दान करून शकते. मात्र,त्यासाठी वयाचे ठराविक बंधन असते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.