भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्तरांचे ११ आॅगस्टला देशव्यापी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 07:47 PM2018-08-01T19:47:46+5:302018-08-01T20:04:41+5:30
भारतीय रेल्वे सेवेत स्टेशन मास्तर हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. एआयएसएमए ही संघटना स्टेशन मास्तरांसाठी काम करते.
पुणे : आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनच्या स्टेशन मास्टरांच्या संघटनेने ११ आॅगस्ट रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण देशभर एकदिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषण करुन प्रशासनाचा निषेध करणार असल्याची माहिती असोशिएशनचे सेक्रेटरी एस ए इनामदार यांनी दिली.
देशातील ३५ हजार स्टेशन मास्तर उपोषणात सहभागी होणार आहेत. रेल्वेच्या कुठल्याही कामाला अडथळा न होता हे उपोषण प्रभावीरित्या पार पाडण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर हा भारतीय रेल्वेचा कणा असून त्याला रेल्वेचा ब्रँड अम्बेसिडर असे समजले जाते.रेल्वेच्या वाहतुकीत तथा सर्व विभागात काम करणा-यांचा तो दुवा असतो. अत्यंत महत्वाच्या पदावर काम करुन देखील प्रशासनाकडून स्टेशन मास्टर कैडरला नेहमीच दुर्लक्षित ठेवले जात असून संघटनेच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. एम.ए.सी.पी. व्दारा मिळणारी बढती (ग्रेड पे ५४००) स्टेशन मास्तरांना देण्यात यावी, संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी स्टेशन मास्तरांना १२ तास ड्युटी करावी लागते. असे अमानवीय रोस्टर रद्द करण्यात यावे, ज्या पासून गाडी संचालनामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. ड्युटी समाप्त झालेल्या स्टेशन मास्तरांसाठी (ज्यांना घरी जाण्यासाठी सुविधा नाही) त्यांना स्टेशनवर निवासाची व्यवस्था करुन देण्यात यावी, प्रशासनाने तयार केलेले स्टेशन डायरेक्टर हे पद अनुभवी व वरिष्ठ स्टेशन मास्तरांना देण्यात यावे. नवीन पेंशन योजनेला होणारा विरोध पाहता ती तातडीने रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागु करावी आदी मागण्या असोशिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वे सेवेत स्टेशन मास्तर हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. यांची संघटना (एआयएसएमए) ही स्टेशन मास्तरांसाठी सतत देशासाठी सेवा करण्याच्या उद्देशाने काम करते. देशभरातील उपोषणाचा कार्यक्रम प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता करण्यात आल्याचे असोशिएशनच्यातर्फे सांगण्यात आले.