चारधाम यात्रेच्या आमिषाने दाम्पत्याची फसवणूक; ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:27 AM2023-06-27T10:27:05+5:302023-06-27T10:29:58+5:30
विमान आणि बस प्रवास खर्च सांगून ५६ हजारांना लुटला
पुणे: चारधाम यात्रेच्या आमिषाने लोणावळ्यातील ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पर्यटन कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील एका दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ड्रिम कास्टर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ड्रिम कास्टर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक ऋषिकेश रामचंद्र भडाळे, संकेत रामचंद्र भडाळे, सुप्रिया संकेत भडाळे (तिघे रा. धायरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रणजित तुलशीदास पवार (वय ३८, रा. निगडी, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे ते दिल्ली विमान प्रवास, तेथून चार धाम बसने परत विमानाने दिल्ली ते पुणे यासाठी प्रत्येकी २६ हजार ६६६ रुपये सांगितले होते. पवार दाम्पत्याने ५६ हजार रुपये भरले. सुरुवातीला यात्रा १६ मे रोजी जाणार होती. हवामान खराब असल्याचे सांगून यात्रा १५ जूनला जाणार असल्याचे सांगितले. त्याअगोदरच भडाळे हा ऑफिस व मोबाइल बंद करून फरार झाला.
आरोपी भडाळे यांच्या विरुद्ध चारधाम यात्रेच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. लोणावळ्यातील ३७ भाविकांची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव तपास करत आहेत.