दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 16:05 IST2021-06-13T16:05:30+5:302021-06-13T16:05:36+5:30
दोघांनी दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले

दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक
पुणे: दारु विक्रीचा बनावट परवाना देऊन एका दाम्पत्याने तब्बल ४० लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुभम दुर्गेश गौर (वय ३३) आणि रुजना गौर (वय २६, दोघे रा. फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार १८ जानेवारी ते १९ सप्टेंबर २०२० दरम्यान शिवाजीनगर न्यायालय व इतरत्र झाला आहे. याप्रकरणी कोथरुडमधील हॅपी कॉलनीत राहणार्या ३३ वर्षाच्या तरुणाने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुजना गौर हिने शुभम गौर हा दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले. बनावट आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी हडपसर येथे नवीन फ्लॅट घेतला. त्यासाठी आम्हाला पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून शिवाजीनगर न्यायालयात समजूतीचा करारनामा करत फिर्यादीशी जवळीक साधून विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्याच्याकडून वेळोवेळी रोखीने व ऑनलाईनद्वारे तसेच फिर्यादीच्या मित्रांकडून असे मिळून एकूण ४० लाख ४३ हजार रुपये घेतले. त्या मोबदल्यात फिर्यादीला मेसर्स सयुरी वाईन्स अँड कंपनी नावाचे दारु विक्री परवाना देतो, असे सांगितले. बनावट दारु विक्री परवान्याची कलर झेरॉक्स व वाईन बार लायसन्सची कलर झेरॉक्स देऊन पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुंढे अधिक तपास करत आहेत.