इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 06:11 PM2021-07-09T18:11:00+5:302021-07-09T18:11:10+5:30
देशात दहा ते पंधरा टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावून आमिष दाखवले.
पुणे: इथोपिया देशात दहा ते पंधरा टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ३० लाखांचा गंडा घातला. ही घटना २०१८ ते जुलै २०२१ कालावधीत बोपोडीत घडली.
याप्रकरणी सोमेंद्र सारस्वत (वय ४३) आणि नेहा सारस्वत (दोघेही रा. जयरास कॉप्लेक्स, बोपोडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केदार गणला (वय ५२, रा. मुंबई ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
केदार आणि सारस्वत दाम्पत्याची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दाम्पत्याने केदार यांना इथोपिया देशातील कॉन्सलेट समवेत ओळख असून, तिथे आमचे काम सुरळितपणे सुरू असल्याचे सांगून त्या देशातील मेडिकल आणि लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवित २० लाख रुपये आरटीजीएस पद्धतीने घेतले. त्यानंतर काही दिवसांनी १० लाख रुपये घेतले.
मात्र, २०१८ पासून जुलै २०२१ पर्यंत सारस्वत दाम्पत्याने त्यांना इथोपिया देशातील मेडिकलचे लायसन्स मिळवून दिले नाही आणि त्यांना इथोपियाला नोकरीसाठी पाठवले नाही. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्याकडे रक्कम मागितली असता, सारस्वत दाम्पत्याने त्यांना धनादेश दिला. मात्र, त्यांनी दिलेला धनादेश वठला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तांबे तपास करीत आहेत.