पोलिसांना धक्काबुक्की करणा-या दाम्पत्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:13+5:302021-06-02T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पत्नीसह एक दिवसाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पत्नीसह एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
शंकर पोटे (वय ३०), त्याची पत्नी दीपाली (वय २५, दोघेही, रा. गल्ली क्रमांक ३, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे अॅड. वाजेद खान (बीडकर) आणि अॅड. आरिफ खान यांनी बाजू मांडली. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल चंद्रकांत केंद्रे यांनी याबाबत फिर्याद दिली. २५ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमधील गल्ली क्रमांक ३ येथे ही घटना घडली. पोलीस मदतीचा फोन आल्याने फिर्यादी आणि आणखी एक पोलीस घटनास्थळी गेले होते. त्यावेळी पोटे याची एका व्यक्तीसोबत भांडणे झाली होती. त्याच्याकडे पिस्तूल आहे, त्याला अटक करा, असे पोटे म्हणत होता. याबाबत पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देण्यास फिर्यादी कॉन्स्टेबल केंद्रे यांनी सांगितले. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या शर्टची गचांडी धरून धक्काबुक्की केली. तर कपडे फाडून खोटी फिर्याद देणार असल्याचे त्याच्या पत्नीला म्हटले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.