एक विवाह ऐसा भी : आहेरात मिळालेल्या १२०० पुस्तकातून 'सचिन-शर्वरी' सुरु करणार वाचनालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:53 PM2019-01-31T13:53:36+5:302019-01-31T13:57:18+5:30
लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरु असताना पुण्यात मात्र एका तरुण जोडप्याने आदर्श निर्माण केला आहे. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेल्या या जोडप्याने आहेर स्वीकारला पण फक्त पुस्तकांचा.
पुणे : लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरु असताना पुण्यात मात्र एका तरुण जोडप्याने आदर्श निर्माण केला आहे. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेल्या या जोडप्याने आहेर स्वीकारला पण फक्त पुस्तकांचा. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी भरभरून आहेर करत १२०० पुस्तके दिली. आता या पुस्तकातून ते दोन वाचनालये सुरु करणार आहेत.
पुण्यात मासिक पाळी 'समाजबंध' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मासिक पाळी व महिला आरोग्य या विषयावर कार्यरत असणाऱ्या सचिन आशा सुभाष व सामाजिक कार्यकर्ती असून प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थापक असणारी शर्वरी सुरेखा अरुण यांनी त्यांचे लग्न फक्त आदर्श नव्हे तर विधायक पद्धतीने केले. या लग्नात त्यांनी केवळ डिजिटल माध्यमात प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेत स्पष्टपणे 'केवळ पुस्तकरूपी आहेर स्वीकारण्यात आनंद आहे' असे नमूद केले होते. या लग्नात त्यांना थोडा थोडका नव्हे तर तब्बल १२०० पुस्तकांचा आहेर आला. त्यात सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमधून सचिनच्या मूळ गावी अर्थात कित्तूर, ता. करमाळा जि.सोलापूर आणि शर्वरीच्या चंदगड, ढोलगारवाडी, जि, कोल्हापूर दोन वाचनालये सुरु केली जाणार आहेत.
सचिन आणि शर्वरीने लग्नाच्या आधी देवदर्शन म्हणून भामरागड, आनंदवन येथे त्यांच्याच भाषेत सांगायचे तर माणसातले देव राहतात त्या तीर्थस्थळांना भेट दिली .लग्न झाल्यावर सासरी गेलेल्या शर्वरीने संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात विवेकी सहजीवन पुस्तकाचे वाण दिले तर त्याच कार्यक्रमात मासिक पाळी विषयाचे समुपदेशनही केले. या विषयावर सचिन म्हणतो, 'दीड वर्षांपूर्वी लातूर मधील एका मुलीने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती, त्यावेळी मी का 'हुंडा घेणार नाही व देणार नाही' अशी शपथ घेऊन तसे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. त्यानुसार लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत जो काही खर्च होईल तो आम्ही दोघांनी मिळून केला. शर्वरी सांगते, 'लग्नाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आमची पद्धतीचे अनुकरण व्हावे अशी इच्छा आहे. जात, धर्म विचारात न घेता सामाजिक उत्तरदायित्वाने लग्न झाले तर गावोगावी वाचनालय उभं राहून येणाऱ्या पिढीची बौद्धिक भूक वाढवण्यास आपण यशस्वी राहू.