‘Couples Not Allowed’ महापालिकेचा निर्णय; पुण्यात प्रेमाला जागा नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:14 PM2022-08-26T19:14:32+5:302022-08-26T19:14:45+5:30
बागांमध्ये जोडप्यांना बंदी असल्यावर प्रेमी युगलांनी जायचं तरी कुठे
पुणे : मुंबईच्या बॅण्डस्टॅण्डमधील एक जोडपे समुद्राच्या भरतीवेळी समुद्रात वाहून गेले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करायला आलेल्या महापौरांनी तेथेच घोषणा केली की प्रेमीयुगलांसाठी खास बाग तयार करणार. आणि तशी बाग महापालिकेने तयारही केली तेथे काही प्रेमीयुगलांनीच बोर्ड लावला की, ‘नो कपल्स, नो एन्ट्री’ त्यामुळे सार्वजनिक बागा आणि रस्त्यावर तासंतास बसणाऱ्या प्रेमीयुगलाची गर्दी कमी झाली. व कपल्सची बाग प्रेमी युगलांनी फुलून गेली. पुण्यात मात्र याच्या नेमकं उलटं घडत आहे.
पूर्वी सारस बाग नंतर कात्रजची बाग आणि आता पाषाण तलावाजवळील बाग व परिसरात ‘कपल्स नॉट आलाऊड’ चा निर्णय खुद्द महापालिकेनेच घेतला. त्यामुळे आता पुण्यातील कपल्सने जायचं तरी कुठे ? की रस्त्यावर आणि रेसिडेन्सिअल एरियाच्या गल्लीबोळातील बाकांवर बसायचे? असा प्रश्न प्रेमी युगलांनी विचारला आहे.
पाषाण तलावाजवळील परिसरात प्रेमी युगलांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिका उद्यान विभागाने का घेतला ? त्यांना निर्णय कशामुळे घेतला असं तिथे घडले तरी याबाबतसुध्दा प्रशासनाकडे उत्तर नाही. प्रेमीयुगलांचा पक्ष्यांना आणि पक्षीनिरिक्षकांना व्यत्यय येतो असे कारण प्रशासनाने पुढे केले आहे.
निर्णय नाही केवळ सुचना फलक
प्रेमीयुगलांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला नाही. कपल्स नॉट अलाउड हा बोर्ड पाच वर्षापूर्वीच लावला आहे. प्रेमीयुगल झाडाझुडपात जाऊन चाळे करतात त्यावेळी त्यांना भान राहत नाहीत. सापांकडून त्यांना दंश होऊ शकतो, किड्यांकडून इजा होऊ शकते त्यामुळे त्यांनी तेथे जाऊ नये इतकीच भावना असते. शिवाय तळ्याच्या पुढच्या बाजूला उद्यान आहे तेथे मात्र प्रेमीयुगल बसत नाहीत त्या मोकळ्या जागी त्यांनी बसावे. त्याला कोणाचाच विरोध होणार नाही. - अशोक घोरपडे (उद्यान विभाग प्रमुख)
सीसीटीव्ही वाढवा, सुरक्षारक्षक नेमा
बागेत काही अनुचित प्रकार घडत असतील तर त्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही लावावेत, सुरक्षारक्षक वाढवावेत त्यामळे अनुचित प्रकारावर आळा बसेल. प्रेमीयुगलांकडूनही जर बागेत बिभत्स वागत असतील तर त्यांच्यावरही वचक राहिल. मात्र प्रेमीयुगलांना एकत्र फिरण्यास, गप्पा मारण्यास किंवा त्यांना एकत्र पक्षीनिरिक्षक करण्यास बंदी घालू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.