घटस्फोट घेणा-यांची जुळली मने, मुलाच्या भवितव्यासाठी दाम्पत्य पुन्हा एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:12 AM2017-12-10T03:12:17+5:302017-12-10T03:12:20+5:30
मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला
पुणे : मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला; मात्र तुटण्याच्या वाटेवर असलेला त्यांचा संसार लोकअदालतीमध्ये झालेल्या समुपदेशनाने पुन्हा जुळला.
न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची आकडेवारी कमी व्हावी. तसेच, दाखलपूर्व दावे सामंजस्याने आणि समुपदेशनाद्वारे निकाली काढण्यात याव्यात, यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणर्फे प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक, प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक पक्षकारांना दिलास मिळाला. लोकअदालतीमध्ये घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे त्यांनी
मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. या खटल्यातील पक्षकार पतीने न्यायालयात २०१२
मध्ये घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. पत्नीबरोबर सतत भांडणे होत असल्यामुळे त्याने हा दावा दाखल केला होता.
सहा वर्षांपासूनचा वाद संपला
गेल्या सहा वर्षांपासून अर्जदार आणि त्याची पत्नी वेगळे राहात आहेत. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यात समेट घडावी म्हणून त्यांचे नातेवाईक आणि मध्यस्थांनी अनेकदा प्रयत्न केले होत. मात्र, त्यांच्यातील वाद संपला नव्हता. त्यांच्या घटस्फोटाचा हा दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला.
लोकअदालतमध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून या दाम्पत्याने तडजोड केली. तसेच पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. त्यांच्यातर्फे अॅड. देवराम झंजाड, अॅड. हेमंत झंजाड, अॅड. नितीन झंजाड यांनी काम पाहिले.