विद्यापीठाकडून गुन्हेगारांच्या रेखाचित्राचा अभ्यासक्रम; पुणे पोलिसांना मदत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:07+5:30
खून, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी बऱ्याच वेळा पोलिसांकडून रेखाचित्र तयार केले जातात...
राहुल शिंदे -
पुणे : गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाची सुध्दा पुणे पोलिसांना मदत होणार आहे. विद्यापीठातर्फे याबाबतच अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. विद्यापीठ व गुन्हे अन्वेषन विभाग (सीआरडी) यांच्यात लवकरच यासंदर्भातील करार होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक लॅब तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे.
खून, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी बऱ्याच वेळा पोलिसांकडून रेखाचित्र तयार केले जातात. मात्र, रेखाचित्र तयार करण्यासाठी कोणतेही प्रशिक्षित मनुष्यबळ पोलिसांकडून शिक्षण संस्थांकडून तयार केले जात नाही. सध्य स्थितीत प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलेल्या वर्णनानुसार स्थानिक कलाकारांच्या मदतीने पोलीस रेखाचित्र काढून घेत आहेत. काही गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या रेखाचित्रावरून लागला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडे काही गुन्ह्यांविषयीचे सीसीटीव्हीतील अस्पष्ट छायाचित्रण उपलब्ध असते. त्यावरून आरोपीचा स्पष्ट चेहरा काढणे आवश्यक असते. त्यामुळे रेखाचित्रण हा विषय गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.
विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी रेखाचित्रांबाबतचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू असून पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी याबाबत पुढील काळात कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला एक दर्जा प्राप्त होणार आहे. केवळ चित्रकलेची आवड असणाऱ्यांना रेखाचित्र काढता येत नाहीत. त्यासाठी मानसशास्त्र, शारीरिकशास्त्र व मूर्तीशास्त्राचे ज्ञान गरजेचे आहे. काही गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्षदर्शी हे लहान मुले किंवा वृध्द व्यक्ती असतात. त्यांनी सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे रेखाचित्र काढण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यापीठाने व पोलीस खात्याने चांगले पाऊल उचलले,असे तज्ज्ञ रेखाचित्रकारांकडून सांगितले जात आहे.
गेल्या २७ वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्हेगारांचे रेखाचित्र काढून देण्याचे काम डॉ. गिरीश चरवड करत आहेत. त्यांनी काढलेल्या रेखाचित्रांच्या आधारे काही मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडणे शक्य झाले आहे. त्यामुळे रेखाचित्र विषयक अत्याधुनिक लॅब उभारणीच्या कामात चरवड हे पुणे पोलिसांना मदत करत आहेत.
डॉ. गिरीश चरवड म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी वाढत चालली असून पोलिसांना दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी फिंगर प्रिंट व लिक्विड लॅब उपलब्ध आहेत. मात्र, आता रेखाचित्र विषयक अत्याधुनिक लॅबच्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढू शकेल.
......
गुन्हेगारांशी निगडीत असलेल्या रेखाचित्र विषयक अभ्यासक्रमाबाबत पुणे पोलिसांशी विद्यापीठाची चर्चा सुरू आहे. विद्यापीठ व सीआयडी यांच्यात लवकरच करार होईल. त्यामुळे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून रेखाचित्र विषयक अभ्यासक्रम सुरू केला जाईल. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ