न्यायालयात वकिलांना मिळणार आता २५ रुपयांत पोटभर जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 03:37 PM2018-04-18T15:37:36+5:302018-04-18T15:37:36+5:30
शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात राज्यभरातून आलेल्या वकिलांची जेवणाची मोठी गैरसोय होत असत. न्यायालयात कमी पैशात चांगल्या जेवणाची सोय झाल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे.
पुणे : महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने वकिलांना केवळ २५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पुणे बार असोसिएशनने सुरू केला आहे. त्यामुळे आता वकिलांना कमी किंमतीत चांगले जेवण मिळणार आहे.
या जेवणात पोळी, एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी आणि डाळ-भात असे पदार्थ असणार आहे. पुणे बार असोसिएशनच्या साई कॅन्टीनमध्ये हे जेवण मिळणार आहे. सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाल्याची माहिती पुणे बार असोसिसशनचे अध्यक्ष अडॅ. सुभाष पवार यांनी दिली. बारच्या नवीन कार्यकारिणीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वकिलीचा अभ्यास करण्यासाठी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात येत असणा-या ज्युनिअर वकिलांची संख्या मोठी आहे. राज्यभरातून आलेल्या या वकिलांची जेवणाची मोठी गैरसोय होत असते. त्यातील अनेक वकील हे सकाळी लवकर न्यायालयात येवून उशिराने घरी जातात. त्यामुळे जेवण करण्यासाठी मेसला जाणे शक्य होत नव्हते. तसेच मेससाठी मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागत. मात्र, आता न्यायालयात कमी पैशात चांगल्या जेवणाची सोय झाल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे.
हा उपक्रम सुरू करण्यात आलेले कॅन्टीन असोसिएशनच्या वतीने चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी वकिलांसाठी जेवण्याची चांगली सुविधा देण्याचा विचार सुरू होता. ज्युनिअरसह इतर वकिलांच्या जेवणाचा प्रश्न लक्षात घेता ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे बारच्या पदाधिका-यांनी सांगितले. पुण्याबाहेरून आलेल्या वकिलांना अशा सुविधेची खूप गरज होती. असोसिएशनने त्यांची गरज लक्षात घेता हा उपक्रम सुरू केला आहे. अधिकाधिक वकिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. भूपेंद्र गोसावी यांनी केले आहे.