DSK यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, न्यायालयात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:08 AM2023-11-21T09:08:33+5:302023-11-21T09:09:05+5:30
आत्ताच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तेची किंमत ५७२ कोटी १२ लाख ९५ हजार ६० रुपये आहे...
पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त करण्यात आलेल्या १९५ स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील मुंबई येथील विशेष न्यायालयात केला आहे. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आत्ताच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तेची किंमत ५७२ कोटी १२ लाख ९५ हजार ६० रुपये आहे.
ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि कुटुंबीयांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एमपीआयडीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये जप्त स्थावर मालमत्तांपैकी ज्या मालमत्तेवर कोणतीही बँक, शासकीय व निमशासकीय संस्था कंपनीची हरकत नाही, अशा मालमत्तेची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच चालू बाजारभावाप्रमाणे या मालमत्तेच्या मूल्याचा तक्ता नोंदणी महानिरीक्षकांकडून तत्कालीन विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना दोनदा प्रसिद्धी करण्यात आली होती. या यादीत एकूण १९५ मालमत्तांचा समावेश आहे.
यादीत असलेल्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याबाबत तत्कालीन सरकारी वकील यांनी अर्ज केला होता. मात्र त्या अर्जावर न्यायालयाचा आदेश न झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून लिलावाची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नवले यांनी या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी मागितली आहे. त्याबाबतचा अर्ज त्यांनी नुकताच न्यायालयात केला आहे. बाणेर, बालेवाडी, बावधन, नगर रस्ता, पेरणे फाटा यासह राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या डीएसके यांच्या मालकीच्या मालमत्तांचा समावेश जप्तीच्या यादीत आहे.