Pune: शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातच भरले कोर्ट; १८३७ किलो मेफेड्रोन पाहण्यासाठी न्यायाधीशच आले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:49 AM2024-02-24T11:49:09+5:302024-02-24T11:50:00+5:30
दिल्लीहून ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना आणण्यात आले आणि पोलिस मुख्यालयातच कोर्ट भरले....
पुणे :पोलिसांनी पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड व दिल्ली येथून आरोपींकडून जप्त केलेल्या एकूण १८३७ किलो किलोच्या मेफेड्रोनची (एमडी) पाहणी करण्यासाठी पहिल्यांदाच जिल्हा न्यायाधीश शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात पोहोचले. तिथेच दिल्लीहून ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना आणण्यात आले आणि पोलिस मुख्यालयातच कोर्ट भरले.
अन्य शहरांतील गोदामांतही ‘एमडी’चा साठा लपवून ठेवल्याची व नेपाळमार्गे परदेशात पाठविल्याची शक्यता पुणे पोलिसांनी न्यायालयात वर्तविली. अमली पदार्थ तस्करीच्या या सर्वांत मोठ्या रॅकेटमध्ये सॅम व ब्राऊन या परदेशी नागरिकांसह आणखी सात आरोपींचा शोध घ्यायचा असल्याचे पुणे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दिल्लीतून अटक केलेले आरोपी संदीप राजपाल कुमार (वय ३९), दिव्येश चरणजीत भुतानी (३८), संदीप हनुमानसिंग यादव (३२) आणि देवेंद्र रामफुल यादव (३२, सर्व रा. नवी दिल्ली) यांना न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींकडून हस्तगत एकूण १८३७ किलो मेफेड्रोनचा पुणे पोलिसांकडून पंचनामा केला जाणार आहे; मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयात आणणे शक्य नसल्याने या मुद्देमालाची पाहणी करण्याबरोबरच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात आले होते.
आतापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड व दिल्ली येथून एकूण १८३७ किलो ‘एमडी’ जप्त केले असून, त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३५७९ कोटी एवढी आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, अमली पदार्थांमुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आणखी तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी राजेंद्र लांडगे व सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली. त्यावर आरोपी तीन दिवस दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होते. त्यांच्या कार्यालय व घरातून अमली पदार्थ जप्त झालेले नाहीत. त्यामुळे पोलिस कोठडीत चौकशीची गरज नाही, असा दावा बचाव पक्षाने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
हा देशाविरोधी गुन्हा
‘अमली पदार्थनिर्मिती व तस्करीच्या गुन्ह्याचे धागेदोरे सोमवारपेठेतून थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. दररोज मेफेड्रोनचा नवीन साठा हस्तगत होत असून, मोठे जाळे उघडकीस येत आहे. त्यामुळे अवघ्या चार ते पाच दिवसांत केस डायरी पाचशे पानांच्या पुढे गेली आहे. अमली पदार्थांचे निर्माते व तस्कर हे प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होऊन तो देशासाठी वाईट दिवस असेल. त्यामुळे हा देशाच्या विरोधातील गुन्हा आहे,’ असे नमूद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.