नांदत्या संसाराला गालबोट लावून नवा घरोबा थाटणाऱ्याचे न्यायलयाने उपटले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:57 PM2019-07-03T19:57:43+5:302019-07-03T20:08:11+5:30
नांदत्या संसाराची राखरांगोळी करुन नवा संसार थाटणा-या उच्चशिक्षित नवरोबाला न्यायालयाने चांगलीच अद्द्ल घडविली आहे.
पुणे : नांदत्या संसाराची राखरांगोळी करुन नवा संसार थाटणा-या उच्चशिक्षित नवरोबाला न्यायालयाने चांगलीच अद्द्ल घडविली आहे. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला दिलेल्या त्रासाबद्द्ल त्याचे कान उपटले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे यापुढे घराच्या थकलेल्या करासहीत देखभालीचा पाच लाख रुपये खर्च दरमहा देण्यास सांगितले आहे. याबरोबरच तसेच याचिका दाखल झाल्यापासून पत्नीसह दोन मुलांना प्रत्येकी १५ हजार रुपये आणि त्यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार यानुसार महिन्याला ३० हजार रुपये देण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सरिता आणि अमित ( नावे बदलली आहे ) परस्पर संमतीने जुलै १९९७ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर काही वर्षातच अमितने त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. त्याचा बाहेरख्यालीपणा वाढु लागला. याविषयी सरिताला काहीच माहिती नव्हती. अचानक एक दिवस तिला आलेल्या फोन वरुन आपल्या नवऱ्याच्या ‘प्रेमप्रकरणाची आणि लग्नाची’ माहिती झाली. याविषयी त्याला जाब विचारताच अमितने सरिताला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील वादाचे पर्यवसान भांडणात झाले. रागाच्या भरात अमितने सरिताला इमारतीवरून खाली फेकून देऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. मुलांवर वडिलांच्या अशा वागण्याचा गंभीर परिणाम झाला. या भीतीमुळेच ते तिघे चक्क आपल्या खोलीला कुलूप लावून झोपायचे. पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार केल्यानंतरही अमितचा त्रास सुरूच होता. एका मध्यरात्री त्याने मुलांसमोर चाकुचा धाक दाखवून धमकी दिली. यासगळ्यातून त्याने मुलांचे काही बरे वाईट करू नये म्हणून सरिता मुलांसोबत वेगळी राहू लागली. अमितने तिचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. त्यातून सरिता देहविक्री करत असल्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने पोलिस आयुक्तालय गाठले. मात्र हे फोटो बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचे पितळ उघड पडले. यासगळ्यात सरिताला चांगल्या पगाराची नोकरीही सोडावी लागली.
एकदा अमितने तिला घराबाहेर गाठून तिच्यावर पिस्तुलातून गोळया झाडून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही झाली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. या सर्व त्रासातून जात असताना सासूच्या सांगण्यावरून २०१२ मध्ये पतीवर केलेले आरोप तिने मागे घेतले. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा माघार घे, पती सुधारेल, जर तो पुन्हा वाईट वागला तर मी माझ्या घरी आसरा देईल अशा आश्वासनांमुळे तिने साक्ष फिरवली. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. एक दिवस झालेल्या भांडणातून तोच घराबाहेर पडला. परंतु, तो पुन्हा घरी आलाच नाही. चौकशी अंती काही महिन्यांनंतर एका महिलेने स्वत़: सरिताला २००९ ला अमितने आपल्यासोबत धर्मांतर करून निकाह केल्याचे सांगितले. सरिताची मुलगी आता २१ वर्षांची तर मुलगा १५ वर्षांचा आहे.