सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 08:56 PM2019-06-19T20:56:29+5:302019-06-19T20:57:49+5:30
नावावर घर असतानाही शारीरिक, मानसिक त्रास देत 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला आहे. हा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला आहे.
पुणे : नावावर घर असतानाही शारीरिक, मानसिक त्रास देत 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला आहे. हा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला आहे. या प्रकरणी वृद्धेला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. मार्चमध्ये दाखल झालेल्या दाव्यात तीन महिन्यांतच अंतरिम आदेश देत न्यायालयाने वृद्धेला दिलासा दिला आहे.
या बाबतची घटना अशी की, उच्चशिक्षित असलेल्या जीवन आणि जान्हवीचा (दोघांची नावे बदलली आहेत) विवाह झाला. ते दोघेही 80 वर्षाची सासू इंदूबाई (नाब बदलले आहे) यांच्या घरात राहत होते. काही दिवसांत सासू-सुनेमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. यातून विकोपाला गेलेल्या भांडणातून सुनेने सासूला घराबाहेर काढले. यानंतरी सासू मुलीकडे राहायला गेली. ती सांभाळ करेल या आशेवर ती दहा- बारा दिवस मुलीकडे राहिली. परंतु, मुलीनेही तिचा सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर सदार महिला वृद्धाश्रमात दाखल झाली. तेथे राहत असताना त्यांनी सून आणि मुलाविरुद्ध ऍड. स्मिता देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात कौटुंबीक छळाचा दावा दाखल केला.
या प्रकरणात न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सून उपस्थित झाली. सासरच्या घरी राहणे हा माझा कायदेशीर अधिकार असल्याचे तिने नमूद करताना मलादेखील राहण्यास द्यायला हवे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर ऍड. देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले, “सासूचे स्वतःचे घर असताना सुनेने तिला घराबाहेर काढले आहे. तिला सध्या कोणाचाही आसरा नाही, मुले असतानाही तिच्यावर ही वेळ आली आहे. वृद्ध असल्याने त्यांना मोठ्याने आवाज, भांडणे सहन होत नाही. त्यामुळे सुनेसह मुलाला घराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात यावे,’ अशी मागणी ऍड. देशमुख यांनी केली. न्यायालयाने सासूने दाखल केलेला दावा मान्य करताना सुनेसह-मुलाला घराबाहेर जाण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.