पत्नीच्या हाताला चावणे पतीला पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:30 PM2020-02-20T20:30:36+5:302020-02-20T20:34:15+5:30
पतीच्या अशाप्रकारच्या अमानुष प्रकारातून मुक्तता व्हावी, यासाठी तिने कौटूंबिक न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पत्नीच्या अर्जाची दखल घेऊन घटस्फोट मंजुर केला. न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा आदेश दिला.
पुणे : प्रेमाचे चार दिवस संपल्यानंतर पतीने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला. अशातच रागाच्या भरात त्याने पत्नीच्या हाताला चावा घेतला. पतीच्या अशाप्रकारच्या अमानुष प्रकारातून मुक्तता व्हावी, यासाठी तिने कौटूंबिक न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पत्नीच्या अर्जाची दखल घेऊन घटस्फोट मंजुर केला. न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा आदेश दिला.
निशा आणि रमेश (दोघांचे नाव बदलले आहे) या दोघांचा १३ मार्च २०१४ रोजी लग्न झाले होते. प्रेमविवाह झाला होता. ते येरवडा येथे राहत होते. त्यांना चार मुले आहेत. रमेश गुंडगिरीकडे वळल्यामुळे त्याला अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्याच्यावर मारहाणीच्या केसेसही दाखल आहेत. तो निशाला नेहमी शिवीगाळ करत असे. तिच्यावर संशय घेणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण असे प्रकार त्याच्याकडून सुरु असत. संसार मोडून पडु नये ती त्याच्याकडून होणारा त्रास सहन करत होती. पतीकडून होणा-या सततच्या त्रासामुळे तिने न्यायालयात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र रमेशने न्यायालयालाआपण परस्परसंमतीने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. त्यासाठी परस्परसंमतीने अटी - शर्ती ठरविण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर तो न्यायालयात येण्याचे टाळू लागला. त्याच्याकडून घटस्फोट मिळावा म्हणून अर्जदार पत्नीने अॅड. सागर नेवसे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.
अॅड. नेवसे यांनी कोर्टाला अर्जदार महिलेच्या पतीविरुद्धचे पुरावे दाखल केले. त्याची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच पत्नीच्या मनगटाला पोहचविलेल्या दुखापतीचा अहवाला सादर केला. परस्परसंमतीने घटस्फोटाच्या अटी ठरवल्यानंतरही न्यायालयात हजर न राहणे, पत्नीला टाळणे हा देखील छळ असल्याचे अॅड. नेवसे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने अर्जदार महिलेचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
मनगटाला चावा घेतल्याने मोठी जखम
सप्टेंबर २०१७ मध्ये आशाला मारहाण करताना उमेशने तिच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की, तिच्या मनगटाची त्वचा: लोंबकळत होती. तिच्या मनगटाला मोठी जखम झाली. ससून हॉस्पिटलमध्ये तिने उपचार घेतले. पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी ती गेली असता पोलिसांनी तिला दादच दिली नाही. त्यामुळे तिने जन - अदालत या संस्थेकडे मदत मागितली होती. या संस्थेतर्फे तिच्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मारहाणीची तक्रार घेतली