न्यायालयीन कामकाज सोमवारपासून नियमितपणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:14+5:302021-01-13T04:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांपुरते मर्यादित असलेले जिल्हा न्यायालयातील कामकाज सोमवारपासून (दि.11) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांपुरते मर्यादित असलेले जिल्हा न्यायालयातील कामकाज सोमवारपासून (दि.11) पूर्णवेळ सुरू झाले. उच्च न्यायालयाच्या सुधारित मानक कार्यप्रणालीनुसार दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू झाल्यामुळे प्रलंबित खटले आता जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ( दि.९) महानगरपालिका व बार असोसिएशनतर्फे सर्व बाररूम्स, लायब्ररी, टेबल स्पेस व चेंबर्समध्ये निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली होती.
यापूर्वी न्यायालयात नियमित सुनावणी होत नसल्याने न्याय मिळण्यास पक्षकार आणि आर्थिक संकटात सापडलेले वकील यांना विलंब लागत होता. न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू झाल्यामुळे आता मोठा पक्षकार आणि वकिलांना दिलासा मिळाला आहे. प्रलंबित खटल्यांवर सुनावणी घेत ते निकाली लागण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, सोमवारी सर्व न्यायाधीश व कर्मचारी प्रत्येक शिफ्टमध्ये हजर होते. पहिल्या शिफ्टमध्ये पुराव्यासाठी लावलेल्या दाव्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तर दुसऱ्या शिफ्टमध्ये युक्तिवाद ऐकणे, निकाल तसेच आदेश पारित केले जाणार आहेत. न्यायालयात सुनावणीसाठी हजर होणे बंधनकारक केलेल्यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जात आहे. न्यायालयाने पुकारा केल्याशिवाय कोर्ट हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कामकाज संपल्यानंतर संबंधितांनी कोर्ट हॉलमधून व न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडण्यास सांगण्यात येत आहे.
...