न्यायालयाचे कामकाज आजपासून दोन शिफ्टमध्ये दोन तासच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:33+5:302021-04-07T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली लागू केली आहे. उद्यापासून (दि.७) न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये दोन तासच सुरू राहणार आहे. तसेच महिन्यातील प्रत्येक शनिवारी न्यायालयातील कामकाज बंद ठेवणार आहे. त्या दिवशी फक्त रिमांड आणि महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
राज्यासह पुण्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने कहर केला आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उच्च न्यायालयाने कामकाजाबाबत नवीन नियमावली लागू केली आहे.
नव्या नियमावली नुसार, सध्या न्यायालयामध्ये अडीच तासाच्या दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू आहे. मात्र, ७ एप्रिलपासून न्यायालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू राहील. मात्र, शिफ्ट अडीच तासाची न राहता ती दोन तासांची करण्यात आली आहे. शक्यतो खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घ्यावी. न्यायालय वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी यांच्या गैरहजेरीत कोणताही आदेश देणार नाहीत. न्यायालयाच्या आवारामध्ये कँटीनमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहील. न्यायालयामध्ये दैनंदिन बोर्डावर मोजक्याच कामांचा उल्लेख करण्यात येणार आहे. बोर्डावर उल्लेख असलेल्या खटल्यांचेच कामकाज त्या दिवशी चालेल. तसेच संबंधित खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत, असे पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सचिन हिंगणेकर यांनी सांगितले.
-----
चौकट
५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज
कौटुंबिक न्यायालयातील कामकाज देखील सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. तसेच न्यायालयामध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू राहणार आहे. यावेळी अनुपस्थित पक्षकार, वकिलांच्या विरुद्ध कोणताही आदेश दिला जाणार नाही. गरज असेल तरच पक्षकार, वकीलांनी न्यायालयात उपस्थित रहावे, असे दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.