काेंढवा प्रकरण : बिल्डरांचा अटकपूर्वी जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 07:32 PM2019-07-02T19:32:50+5:302019-07-02T19:34:55+5:30
काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला.
पुणे : काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे तिघा बांधकाम व्यावसायिकांना कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी हा अर्ज फेटाळला.
काेंढवा येथे भिंत काेसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी आल्कन स्टायलस आणि कांचन हाऊसिंग या दाेन्ही इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकांवर सदाेष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. यापैकी आल्कन स्टायलस इमारतीचे बांधकाम व्यावसायिक विवेक सुनिल अगरवाल (वय ३२) आणि विपुल सुनिल अगरवाल (वय ३० दोघे रा. क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यांना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान या दाेन्ही बांधकाम व्यावसायिकांच्या पाेलीस काेठडीत 6 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचबराेबर कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
तीनही अर्जदार एकाच कंपनीचे भागीदार आहेत. त्यांचे दुसऱ्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. त्यांनी कामगारांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. दुर्घटनाग्रस्त लेबर कॅम्प हा ठेकेदाराच्यामार्फत उभारण्यात आला होता. संबंधित कॅम्प हा भिंतीपासून दहा फुटाच्या अंतरावर होता. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली असून अति पावसामुळे ती भिंत पडली आहे, असे समिती स्थापन करण्यासाठीच्या अहवालामध्ये नमूद आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहे. जबाबदारी निश्चित करण्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे, सुधीर शहा, नंदिनी देशपांडे, नीलिमा वर्तक यांनी केली होती.
दरम्यान इमारतीचा आराखडा, एने, विकसक करार, सर्वे रिपोर्ट अशी विविध प्रकारचे कागदपत्रे सोमवारी सुनिल अगरवाल आणि विपुल सुनिल अगरवाल यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्या कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याबाबत आरोपींकडून माहिती घ्यायची आहे. तसेच ते तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी केली. सरकार पक्षाच्या वतीने ज्याेती वाघमारे यांनी युक्तिवाद केला.