हनुमंत नाझीरकर व त्यांच्या भाच्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:39+5:302021-05-23T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वत:सह कुटुंबीयांच्या नावाने ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वत:सह कुटुंबीयांच्या नावाने ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर आणि त्यांचा भाचा राहुल खोमणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
दोन्ही आरोपींनी इतरांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. तसेच ते पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने पोलिसांनी जामिनास विरोध करताना न्यायालयात सांगितले.
नाझीरकर यांनी सासऱ्यांच्या नावे ३५ आणि स्वत: व पत्नीच्या नावाने १७ स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सासऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांचे बनावट मृत्यूपत्र तयार करून त्यांनी सर्व मालमत्ता व कंपन्या या पत्नी संगीता नाझीरकर यांच्या नावाने वर्ग केल्या आहेत. नाझीरकर आणि खोमणे यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. जामीन मिळाल्यास या प्रकरणातील साथीदारांना नाझीरकर धमकावू शकतात. कारण, साक्षीदार हे नाझीरकर यांच्या कंपनीत भागीदार आहेत. नाझीरकर यांनी यापूर्वी शेतमाल विक्री संदर्भात खोमणे याच्या माध्यमातून विक्रेत्यांना धमकावले आहे. जामीनावर सुटका झाल्यावर ते पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.
नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांकडे ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. तर नाझीरकर यांच्या बेनामी मालमत्ता बँकेत गहाण ठेवून त्याद्वारे खोमणे यांनी ४८ लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यानंतर ती रक्कम नाझीरकर कुटुंब भागीदार असलेल्या कंपनीत गुंतवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणे याने तयार केलेल्या बनावट करारनाम्यापैकी ३५ करारनामे हस्तगत करण्यात आलेले आहेत. खोमणेंच्या वैयक्तिक बँक खात्यावर ८७ लाख रुपयाचे झालेले व्यवहार, गीतांजली ब्रिडर्स कंपनीत गुंतविलेले २३ लाख इत्यादी स्वरूपात केलेली गुंतवणूक ही त्याचे उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे करीत आहेत.