बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; सुनावणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:15 IST2024-12-03T15:10:50+5:302024-12-03T15:15:47+5:30
दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; सुनावणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
पुणे : वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसतानाही प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरला न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
मिलनकुमार अमर ठाकूर (वय ३४, रा. धानोरी, मूळ पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत २० ऑगस्ट २०१४ रोजी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा उमेश गलांडे ऊर्फ डॉ. रेखा लबडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सायली ठोकळ यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत मारूडे यांनी तपास केला.
पुणे महापालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. रेखा उमेश गलांडे या बोगस डॉक्टर शोधमोहिमेअंतर्गत बोगस डॉक्टरचा शोध घेत होत्या. त्यावेळी ठाकूरकडे ॲलोपॅथीची कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना औषधांचा साठा आढळून आला.
बीईएमएस व्यावसायिकांना डॉक्टर उपाधी लावण्याचा अधिकार नसताना त्याच्याकडे लेटर पॅड व डॉक्टर उपाधीचा शिक्का आढळून आला. त्याद्वारे तो व्यवसाय करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.