बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:08 PM2018-08-09T21:08:27+5:302018-08-09T21:12:38+5:30
न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले.
पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चात शहरातील वकीलही सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाला सुट्टी देण्यात आली नसली तरी वकीलवर्ग व पक्षकार न आल्याने गुरुवारी कामकाज ठप्प होते.
न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. तसेच अनेक वकील देखील मोर्चात उत्स्फू र्तपणे सहभागी झाले होते, अशी माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनचे (पीबीए) अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी दिली.बंद जाहीर करण्यात आल्यामुळे वकिलांनी देखील पक्षकारांना सुनावणी होणार नसल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे त्यामुळे अनेक पक्षकार देखील न्यायालयात आले नाही. इतर दिवशी वकील आणि पक्षकारांची गर्दी असणा-या न्यायालयात गुरुवारी शुकशुकाट दिसत होता. कौटुंबिक न्यायालयात देखील असेच चित्र होते. दरम्यान, कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, येथे कोणताही गैरप्रकार झाला नाही, अशी माहिती न्यायालयातील चौकीचे पोलीस निरीक्षक प्रकाश शहा यांनी दिली.
आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांनी याबाबतची माहिती पीबीएला द्यावी, असे आवाहन अॅड. पवार यांनी यावेळी केले. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले, असे अॅड. पवार यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी यापुर्वी पीबीएच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. भूपेंद्र गोसावी, अॅड. रेखा करंडे, सचिव अॅड. संतोष शितोळे, अॅड. लक्ष्मण घुले, खजिनदार अॅड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस अॅड. सुदाम मुरकुटे, अॅड. पांडुरंग थोरवे, माजी उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड आदी यावेळी उपस्थित झाले होते.