बँक कर्मचाऱ्यांच्या सौजन्यशीलतेने फुंकर
By admin | Published: November 17, 2016 04:48 AM2016-11-17T04:48:09+5:302016-11-17T04:48:09+5:30
बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांच्या मनस्तापावर बॅँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सौजन्यशीलतेची फुंकर घालण्यात येत आहे.
पुणे : नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांच्या मनस्तापावर बॅँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सौजन्यशीलतेची फुंकर घालण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सर्वच बॅँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. यासाठी बॅँकेचे कर्मचारी आणि अधिकारी दिवस-रात्र काम करत आहेत. अनेक बॅँकांमध्ये तर रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत हिशेबाची कामे पूर्ण करताना कर्मचारी दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर बॅँकेकडून ग्राहकांना चहा, बिस्किटे देण्याबरोबरच त्यांचे फॉर्म भरण्यासाठी मदत केली जात आहे. अनेक स्वयंसेवी संघटनांनीही यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्याकडून ग्राहकांना मदत केली जात आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे सेवाकार्य
आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे १५ बॅँकांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार बाटल्या देण्यात आल्या. संस्थेने हा सेवाभावी उपक्रम सुरु केला असून, विविध बँकांच्या ३० शाखांमध्ये नागरिकांना अर्ज भरण्यासाठी मदत करणे, ओळखपत्राच्या झेरॉक्स काढून देणे, रांगेत गोंधळ होऊ नये यासाठी प्रयत्न केले. ज्येष्ठ नागरिकांना आणण्यापासून सोडण्यापर्यंत तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या या कामाचे नागरिकांनी कौतुक केले. सुनील पोतदार, अर्चना राजारामण, शैली श्रीवास्तव, मनोज शहा यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते, अशी माहिती प्रसिद्धिप्रमुख कुमकुम नरेन यांनी सांगितली.
ई-बँकिंग वापरासाठी मार्गदर्शन
मॉडेल कॉलनी येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये ग्राहकांना डेबिट/एटीएम कार्डव्दारे कॅशलेस पेमेंटच्या सुविधेचा वापर कसा करावा, ई-बँकिंग कसे वापरावे, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पैसे बदलून देण्यासाठी काउंटरच्या संख्येत वाढ करून चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला होत आहे. ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागू नये, याकरिता बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था मॉडेल कॉलनी येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर गर्दीतील नागरिकांना पाणी, चहावाटप करण्यात येत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेच्या सहायक महाप्रबंधक चित्रा दातार यांनी दिली.
उत्तम सेवेमुळे ग्राहक संतुष्ट
बँक आॅफ महाराष्ट्रच्या सेनापती बापट रस्ता शाखेतील कर्मचाऱ्यांनी ९ नोव्हेंबरपासून बुधवारपर्यंत सातत्याने, भूकेची पर्वा न करता सर्व ग्राहकांना नोटा बदलून देण्याचे तसेच स्वीकारण्याचे काम केले. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाची भावना आहे. वेळोवेळी सूचना फलक लावणे, रांगेतील ग्राहकांना कागदपत्रे बाळगण्याविषयी सांगणे व नव्या नियमांची माहिती रांगेत फिरुन देणे अशा कामामुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळू शकली. महिला कर्मचाऱ्यांनी त्याबाबत चांगले नियोजन केले. वृद्ध ग्राहकांनाही तत्परतेने सेवा देण्यात आली. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने नोटा तपासणी व मोजणी यंत्र पाठविल्याने एक जादा काउंटर सुरू करुन ग्राहकांना कमीत कमी वेळेत सेवा मिळाली. शाखा प्रमुख प्राची झा यांनी वेळोवेळी ग्राहकांशी संपर्क साधून मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्साही कर्मचाऱ्यांच्या सहभागाने कोणत्याही प्रकारची तक्रार न येता सर्व ग्राहकांना अधिकाधिक रक्कम दिली. एकही ग्राहक निराश होऊन परत गेला नाही.
अन् ३ कोटींची पैशांनी भरलेली बॅग घेऊन आला
धायरी येथील एका खासगी बँकेमध्ये बुधवारी सकाळी ३ कोटी रूपयांची पैशांनी भरलेली बॅग घेऊन एक जण आला. माझे खाते उघडून हे पैसे जमा करून घ्या, अशी विनंती त्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांना केली. एवढी रोख रक्कम भरल्यामुळे तुम्हाला आयकर व दंड भरावा लागेल, असे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितले. मात्र, तरीही तो पैसे जमा करून घ्या, असे बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगत होता. शेवटी कशीबशी त्याची समजूत काढून बँकेतील लोकांनी त्याला परत पाठविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. वस्तूत: त्याचे पैसे बँकेने जमा करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा अहवाल आयकर विभागाकडे पाठविणे आवश्यक असताना या भानगडीत पडायला नको, अशी भूमिका बँकेकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.