हातगाडी विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे : गिरीश बापट; रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:32 PM2018-01-02T14:32:57+5:302018-01-02T14:36:53+5:30
हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
पुणे : रस्त्यावरील अन्न पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागातर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन व एका खासगी कंपनीच्या सहकार्याने टिळक वाडा येथे रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बापट बोलत होते. कार्यशाळेत विक्रेत्यांना प्रशिक्षित करणाऱ्या ‘क्लासरूम आॅन व्हील’ या बसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, प्रभाग समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक महेश लडकत, अन्न औषध विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, पुण्यात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. विद्यार्थ्यांसह इतरांना सुरक्षित अन्न मिळते का? हे पाहण्याची जबाबदारी अन्न व औषध विभागाची आहे. त्यासाठी प्रशासनाने त्यांना योग्य मार्गदर्शक केले पाहिजे.
दरम्यान, ‘क्लासरूम आॅन व्हील’ या बसमधून येत्या १५ जानेवारीपर्यंत शहरातील ४७ ठिकाणी फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जावून प्रशिक्षण दिले जाणार आहे.