Pune Crime: केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहिणीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 02:59 PM2022-11-11T14:59:22+5:302022-11-11T15:01:16+5:30
जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार...
केंदूर (पुणे) : शिरूर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून केंदूर येथील महादेववाडीमध्ये एका भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी भावाचे नाव आहे.
केंदूर येथील महादेववाडीमधील विलास साकोरे व त्याची चुलत बहीण आशा साकोरे यांच्यात जमिनीच्या वाटपातून वाद सुरू होते. अनेक दिवस वाद सुरू असल्याने आज सायंकाळच्या सुमारास आशा या घरासमोरील रस्त्याने जात असताना विलास साकोरे हा कोयता घेऊन त्यांच्या जवळ आला आणि आशा यांच्या डोक्यावर व अंगावर वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडून आशा यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, वैभव स्वामी, नितीन अतकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवलदार शिवाजी चितारे, पोलीस नाईक विशाल देशमुख, आत्माराम तळोले, राहुल वाघमोडे, अमोल दांडगे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत, काही नागरिकांच्या मदतीने खून करणाऱ्या विलास यशवंत साकोरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.