‘कोविड शववाहिका ॲप’द्वारे स्मशानभूमीतील ‘वेटिंग’ टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:01+5:302021-04-24T04:12:01+5:30
पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी सहा ते आठ तासांचे वेटिंग असल्यामुळे नातेवाइकांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा ...
पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी सहा ते आठ तासांचे वेटिंग असल्यामुळे नातेवाइकांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे. नातेवाइकांचा हा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने ‘कोविड शववाहिका ॲप’ सुविधा सुरू केली आहे. या अॅपद्वारे एकाच वेळी रुग्णालय, नातेवाईक आणि चालकाला मेसेज मिळणार असून यामध्ये अंत्यविधीसाठीची स्मशानभूमीची उपलब्धतता, रुग्णालयाचे नाव, चालक आणि शववाहिकेचे नाव अशी सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठीचे ‘वेटिंग’ कमी करण्यास मदत होणार आहे.
रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत ''वेटिंग'' असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करीत अंत्यविधींची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी पुढाकार घेत ''कोविड शववाहिका'' या नावाने हे ॲप तयार केले आहे. पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्या यांच्याकडे शुक्रवारी या ॲपचे सादरीकरण करण्यात आले. शुक्रवारपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये रुग्ण आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह कुटुंबीयांना न देता पालिकेच्या स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी पालिकेकडून शववाहिका उपलब्ध करून दिली जाते. यासाठी पालिकेने हेल्पलाईन सुरू केलेली आहे. या हेल्पलाईनवरील नंबर अनेकदा लागत नाहीत. बहुतांश वेळा ''एंगेज'' असतात. फोन आल्यानंतर आवश्यक माहिती घेण्यात भरपूर वेळ जातो. त्यामुळे इतर नागरिकांचे फोन लागत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आल्याचे कंदुल यांनी सांगितले.
----
कसे वापराल ॲप?
हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून रुग्णालयातील कर्मचारी अथवा या रुग्णाच्या नातेवाईकाने डेथपास क्रमांक सांगायचा आहे. पालिकेचे कर्मचारी हा क्रमांक ॲपमध्ये टाकतील. सिस्टिमद्वारे रुग्णांची संपूर्ण माहिती तातडीने उपलब्ध होईल. शववाहिकेचा क्रमांक, चालकाचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक तसेच अंत्यसंस्कार करायचे आहेत त्या स्मशानभूमीचे नाव अशी माहिती एसएमएसद्वारे संबधित नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाला जाणार आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांची माहिती देखील शववाहिका चालकाला मिळणार आहे.
------
कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी होईपर्यंत नातेवाइकांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिका विविध पद्धतीने उपाययोजना करत आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
-----
मागील तीन दिवसांत शववाहिकेचे झालेले कॉल
तारीख। कॉल
२१ एप्रिल। १३१ ५० (ससून)
२२ एप्रिल। ११०
२३ एप्रिल। ९१ (संध्याकाळी ५ पर्यंत)
-----