पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:40 PM2021-12-08T19:40:06+5:302021-12-08T19:43:05+5:30
जिल्ह्यात शंभर टक्के लोकांचा पहिल डोस पूर्ण करणे आणि सर्व पात्र लोकांना दुसरा डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेचा फायदा झाला...
पुणे: शासनाकडून मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून दिले जात असताना ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नोव्हेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यामुळेच बुधवार (दि.8) रोजी दुपारी जिल्ह्यातील शंभर टक्के 83 लाख 44 हजार 544 लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला. तर 54 लाख 82 हजार (65.7%) लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यासह जिल्ह्यात जानेवारी 2021 महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पण सुरूवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. परंतु जुलै- ऑगस्ट पासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लसीचे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात ख-या अर्थाने ऑगस्ट नंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला.
शासनासोबतच खाजगी रुग्णालये आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लसीकरणासाठी पुढाकार घेतला. तर जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी करून दिवसाला तब्बल एक-दीड लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होईल असे नियोजन केले. "मिशन कवच कुंडल " अभियानांतर्गत तर दिवस रात्र व सुट्टीच्या दिवशी स्वतंत्र विकेंड लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
जिल्ह्यात अनेक आमदार- खासदार व लोकप्रतिनिधींने देखील पुढाकार होत आपल्या मतदारसंघात विशेष लसीकरण मोहिम राबविल्या. तरी देखील 15 नोव्हेंबर पर्यंत केवळ 95 टक्के लोकांचा पहिला डोस झाला होता. यामुळेच जिल्हाधिकारी देशमुख यांनी नोव्हेंबर अखेर पर्यंत शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली व 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यात शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
हर घर दस्तक मोहिमेमुळे उद्दिष्ट पूर्ण
जिल्ह्यात शंभर टक्के लोकांचा पहिल डोस पूर्ण करणे आणि सर्व पात्र लोकांना दुसरा डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेचा फायदा झाला. आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी, शालेय शिक्षण व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचा-यांनी घरोघरी जाऊन गृहभेटी देवून लसीकरणातून सुटलेले पात्र लाभार्थी यादी तयार करून जवळच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले. यामुळेच शंभर टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता आले.
- आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद