शिरूरमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या कोविड १९ लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:54+5:302021-03-17T04:11:54+5:30
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना माध्यमिक व उच्च माध्यमिक ‘शिक्षक कोरोना लसीकरणापासून वंचित’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य ...
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना माध्यमिक व उच्च माध्यमिक ‘शिक्षक कोरोना लसीकरणापासून वंचित’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचालींना वेग येऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची माहिती मागविण्यात आली आहे. ती प्राप्त झाल्यानंतर विविध केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरण टप्प्या टप्प्याने तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी सांगितले. शासनाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी शाळा २३ नोव्हेंबरपासून इ. ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले, तर गेल्या २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते.परंतु पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने पुन्हा शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आले आणि आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड प्रतिबंधक नियमांचा व उपायांचा वापर करून १५ मार्च पासून शासनाच्या निर्देशानुसार इ. १० वी व १२ वीचे वर्ग सुरू पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
येत्या २३ एप्रिलला बारावीच्या आणि २९ एप्रिलला दहावीच्या परीक्षा सुरू होणार असून वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांची कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरुवात केली असल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून त्याची सुरुवात भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करून झाली असल्याचे कदम यांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्याधिकारी डॉ. दामोदर मोरे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, आरोग्य विस्तारअधिकारी प्रकाश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षकांनाचा लसीकरणाचा पहिला डोस देऊन उद्घाटन करण्यात आले.
चौकट
कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्यानंतर एखाद्यावेळेस ताप येणे, अंग दुखणे असे प्रकार होऊ शकतात. पण या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. ही लस अत्यंत सुरक्षित आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच जनजागृती करत आलेलो आहोत. सर्वांनी नियोजनाप्रमाणे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोडेराव यांनी केले आहे. फोटो:शिरूर तालुक्यात माध्यमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली.