कोविड केअर सेंटर सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबधितांसाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:49+5:302021-04-24T04:11:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोविड केअर सेंटर (सीसीसी) हे केवळ ज्या कोरोनाबाधितांना घरात स्वतंत्र राहता येत नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोविड केअर सेंटर (सीसीसी) हे केवळ ज्या कोरोनाबाधितांना घरात स्वतंत्र राहता येत नाही, अशा रुग्णांना विलग ठेवण्यासाठी उभारण्यात आले आहेत़ त्यामुळे सीसीसीमध्ये कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात जी प्राथमिक औषधे दिली जातात, त्याव्यतिरिक्त रेमडेसिविर इंजेक्शन अथवा इतर पुढील उपचारांना शासनाच्या निर्देशानुसार परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
सीसीसीमधील रूग्णांची प्रकृती खराब झाल्यास संबंधित रूग्णाला रूग्णालयात हलविण्यात येईपर्यंत, त्याला लागलीच ऑॅक्सिजनसह उपचार मिळावेत याकरिता केवळ काही आॅक्सिजन बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे़ मात्र सीसीसी हे केवळ सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठीच असल्याचेही डॉ़ भारती यांनी स्पष्ट केले़
महापालिकेव्यतिरिक्त शहरात १८ खाजगी कोविड केअर सेंटरला की जी, जवळच्या खाजगी रूग्णालयांशी संलग्न आहेत अशांनाही परवागनी देण्यात आली आहे़ मात्र या सर्व ठिकाणीही केवळ ज्यांना घरात विलग राहता येत नाही, त्यांना राहण्यासाठीची सोय म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे़ त्यामुळे जुजबी उपचार व गृह विलगीकरणात असलेली औषधे वगळता या कोणत्याही सेंटरमध्ये रूग्णालयांत होणाऱ्या अन्य उपचारांप्रमाणे इतर उपचार करण्यास परवानगी नाही़
पुणे शहरात महापालिकेच्या वतीने सध्या रक्षकनगर क्रीडा संकुल (खाटांची क्षमता : २५०), बनकर शाळा हडपसर (खाटांची क्षमता : ३००), संत ज्ञानेश्वर वसतिगृह येरवडा (खाटांची क्षमता : ५००) व गंगाधाम अग्निशामक दल इमारत बिबवेवाडी (खाटांची क्षमता : २००) अशा चार ठिकाणी १ हजार २५० खाटा असलेले कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत़ यापैकी सध्या ८०२ खाटांवर सौम्य लक्षणे असलेलेले कोरोनाबाधित राहत आहेत़ आता खाजगी कोविड केअर सेंटरला महापालिकेकडून सर्व अटींची पूर्तता केल्याशिवाय नव्याने परवानगी देण्यात येत नाही़
-------------------------------