खेड तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’दोन महिन्यांपासून धूळखात; रुग्णांवर उपचारासाठी होतेय धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:20 PM2020-07-08T21:20:09+5:302020-07-08T21:33:25+5:30
खेड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ
राजगुरूनगर: दोन महिन्यापूर्वी मे माहिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून खेड चांडोली, आळंदी, चाकण, येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाग्रस्त बाधित व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी तसेच तिथे हे रुग्ण राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अपुरा कर्मचारी स्टाफ असल्यामुळे येथील केअर सेंटर सुरू झाली नाहीत. परंतू ,खेड तालुक्यातील चांडोली, चाकण आळंदी येथील कोविड सेंटर दोन महिन्यापासुन अपुऱ्या वैद्यकीय मनुष्यबळामुळे धूळखात पडून आहे. तात्काळ ही कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भाजपाचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी (दि.८) दुपारी अचानक चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरची पाहणी केली.यावेळी वैद्यकीय अधीक्षक माधव कणकवले ,वैद्यकीय अधिकारी दिपक मुंढे व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून चांडोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्याला मे महिन्यात परवानगी देण्यात आल्यानंतर स्वॅबची मशिनरी देण्यात आली.त्यानंतर ६५ बेडस् तयार केल्या असूनही हे सेंटर दोन महिने सुरू नाही. बुट्टे पाटील व देशमुख यांनी याबाबतची सविस्तर माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक मुंढे यांच्याकडून घेतली.
खेड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ सुरू आहे.तालुक्यात म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू आहे. म्हाळुंगे येथे दररोज फक्त ४५ ते ५० स्वॅब घेतले जातात व त्याचा रिपोर्ट तीन किंवा चार दिवसांनी येतो. आळंदी व चाकण येथेही ग्रामीण रुग्णालयात देखील सेंटर सुरू नाही. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांना भेटून बुट्टे पाटील व देशमुख यांनी वस्तुस्थिती मांडली. याबाबत तेली यांनी सांगितले की, लवकरच चांडोली ,चाकण, आळंदी येथील आरोग्य केंद्रावर कोविड केअर सेंटर सुरू करून याठिकाणी रुग्णांना ये- जा करण्यासाठी अॅम्ब्युलन्सची सेवा पुरवण्यात येईल.
..........................................................
कोविड केअर सेंटर सुरू करण्याला आमची काहीही हरकत नाही, माझ्यासह सर्व कर्मचारी तयार आहोत. परंतु त्यासाठी कर्मचारी वर्ग व खर्चाला निधी मिळाला नाही.कोरोना रुग्ण वाढलेत हे खरे आहे. चांडोली येथील रुग्णालयात पावसाळा सुरू असल्याने रोज विविध आजाराचे १००ते १५० रुग्ण येत आहे. त्यामध्ये काही कोरोनाचे रुग्ण येत आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तींना पुढे पाठविण्यासाठी रुग्णवाहिका नाही,लॅब असिस्टंट नाही,तसेच १०८ ला फोन केला तर रुग्णवाहिका मिळत नाही.अनेक अडचणी आहेत. २ कोटी ९२ लाख सेंटर सुरू करण्यासाठी खर्चाचा अहवाल प्रांताना दिला असता कमी खर्चाचा अहवाल द्या म्हणल्यावर आम्ही १ कोटीपर्यंत दिला.अद्याप काहीच कार्यवाही नाही - दिपक मुंढे, वैद्यकीय अधिकारी, चांडोली, ग्रामीण रुग्णालय )