शिनोली येथे कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:51+5:302021-04-17T04:09:51+5:30
-- घोडेगाव : शिनोली (ता. आंबेगाव) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आदिवासी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ...
--
घोडेगाव : शिनोली (ता. आंबेगाव) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आदिवासी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची येथे व्यवस्था केली जाणार आहे. सेंटरचे उद्घाटन शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती संजय गवारी व उपसभापती संतोष भोर यांच्या हस्ते झाले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आहुपेसारख्या अतिदुर्गम आदिवासी गावात एकाच दिवशी २० रूग्ण मिळून आले. तशीच अवस्था पिंपरगणेमध्ये १२, कोंढवळमध्ये १० रूग्ण आढळून आले. त्यामुळे या दुर्गम भागातून रुग्णालय शोधण्यासाठी नागरिकांची पळापळ होऊ नये यासाठी आदिवासी भागातच त्यांची व्यवस्था व्हावी, यासाठी शिनोली येथील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहात हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
वसतिगृहात १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास ती वाढवली जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या नेमणुुका करण्यात आल्या आहेत. हे वसतिगृह असल्याने वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या असून प्रत्येक खोलीला स्वच्छतागृह असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रूपाली जगदाळे, माजी सभापती कैलासबुवा काळे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, मधुआप्पा बो-हाडे, शिनोलीच्या सरपंच शकुंतला काळे, उपसरपंच सुनील बोऱ्हाडे, डी. बी. बोऱ्हाडे, दत्ताशेठ थोरात, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. प्रशांत कुटे इत्यादी उपस्थित होते.
---
फोटो : 16042021-ॅँङ्म-ि02 - शिनोली (ता. आंबेगाव) येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर. या वेळी उपस्थित देवेंद्र शहा.