पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 02:55 PM2023-03-13T14:55:41+5:302023-03-13T14:55:51+5:30
बैलगाडा शर्यतीतील बैलाला अशी विक्रमी किंमत मिळत असताना आता गायीलाही उच्चांकी किंमत मिळाली
मंचर : बैलगाडा शर्यतीतील बैलाला तब्बल ३० लाख रुपये अशी विक्रमी किंमत मिळाल्यानंतर आता गायीलाही उच्चांकी किंमत मिळाली आहे. मंचर येथील गोपालक शेतकरी गणेश खानदेशे यांनी डेन्मार्क जातीची सोनू नावाची एक गाय तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांना विकत घेतली असून समाज माध्यमातून या गायीची चर्चा सध्या सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक किंमत या गायीला मिळाली आहे.
गणेश अनंत खानदेशे यांनी सोलापूर (सदाशिवनगर) येथील शेतकरी संजय सालगुडे पाटील यांच्याकडून डेन्मार्क जातीची जास्त दूध देणारी गाय तब्बल अडीच लाख रुपयांना खरेदी केली आहे. या गायीचे नाव सोनू असे आहे. यापूर्वी खानदेशे यांनी त्यांची एक गाय तब्बल १ लाख ३१ हजार रुपयांना विकली होती. त्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. या गायीचे खानदेशे यांच्या घरी आगमन झाल्यानंतर तिचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तिच्यासाठी सुसज्ज असा गोठा बनवण्यात आला आहे. त्या गोठ्यात २४ तास पाणी व चाऱ्याची व्यवस्था केली आहे. मुक्त संचार गोठा असून गायीला फिरण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे. तिच्या खाण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
डेन्मार्क जातीची गाय सर्वगुणसंपन्न आहे. अतिशय शांत स्वभाव, जास्त दूध देणारी जातिवंत गाय असून ती आजारास लवकर बळी पडत नाही. तिचे वय साडेचार वर्षे आहे. वजन नऊ क्विंटल आहे. उंची सहा तर लांबी आठ फूट आहे. शरीराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा, कान, डोळे, डोके लहान गुडघ्याच्या वर कासेची ठेवण, सडात योग्य अंतर, रंगाने काळी, पायाचा मागील भाग सरळ असा आहे. विशेष म्हणजे या गायीची दूध क्षमता दर दिवशी ४० ते ४२ लीटर एवढी आहे.
सध्या देशात दूधटंचाई निर्माण झाल्याने दुधाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडीअडचणी सामुदायिक पद्धतीने एकत्र येऊन कार्यशाळा, प्रकल्पांना भेटी चर्चासत्र याद्वारे सोडवता येतील. पशुखाद्याचे भाव वाढले असून शासनाने त्यावर नियंत्रण ठेवल्यास दुग्ध व्यावसायिकांना फायदा होईल.