कात्रज डेअरीकडून गायीचे दूध दाेन रुपयांनी हाेणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:58 AM2023-12-01T09:58:51+5:302023-12-01T09:59:37+5:30
संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
धनकवडी : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीने १ डिसेंबरपासून गायीच्या दुधाच्या विक्रीदरात प्रतिलीटरला दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, दुधाचा दर आता ५५ वरून ५३ रुपये करण्यात आला असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.
या निर्णयामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच कमी स्निग्ध व जास्त प्रोटीन असलेले गायीचेदूध २५० मिली.च्या पॅकिंगमध्ये ग्राहकांना १२ रुपये दराने दूध उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष पासलकर यांनी दिली. ज्या दूध संस्था कात्रज पशुखाद्याची दुधाच्या प्रमाणात खरेदी करतील, अशा दूध संस्थांच्या दुधाची खरेदी प्रतिलीटर एक रुपया दराने वाढवून देण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले.