गोसंरक्षण करणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:58 AM2019-12-08T02:58:56+5:302019-12-08T03:00:28+5:30
देशी गाईंचे महत्त्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.
पुणे : देशी गाईंचे महत्त्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. मानवी जीवन तसेच शेतीसाठीही देशी गाय महत्त्वाची आहे. उपयोगी पडणाºया सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे, म्हणूनच गोमातेला वाचवणारी एक सक्षम यंत्रणा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
गो विज्ञान संशोधन संस्था व दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे भागवत यांच्या हस्ते मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार देण्यात आले. समितीचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. पिंगळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
भागवत म्हणाले, देशी गाईंवर आधारीत शेतीतून पिकणारे धान्य विषमुक्त होते, आता खतांमधून तयार होणारे धान्य विषयुक्त आहे. कत्तलखान्यात जाणाºया गाई वाचवल्या तर त्या पाळण्यासाठी कोणी तयार होत नाही. कत्तलखान्यात गाई नेणारेही हिंदू ठेकेदारच असतात. म्हणूनच गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य आहे.
मोरोपंत पिंगळे हे अशक्य कामे करणारे व्यक्तिमत्व होते. सरस्वती नदीचा त्यांनी शोध लावला. १५ व्या शतकापासून राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न होत होता. पिंगळे यांनी ते काम हाती घेतले व आता मंदिर बांधले जाणार आहे. गो संरक्षण हाही त्यांचाच ध्यास होता, असे भागवत म्हणाले. कोलकाता येथील गो सेवा संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुदरंगी, भोसरी येथील अजित उदावंत, पुनम राऊत, शाम अगरवाल यांना गो सेवा पुरस्कार देण्यात आले.