ऐकावे ते नवलच; वाल्ह्यात गाईचे डोहाळजेवण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:45 AM2018-12-28T00:45:21+5:302018-12-28T00:45:26+5:30
ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो, कुठला सण असो वा अन्य कुठला कार्यक्रम.
वाल्हे - ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो, कुठला सण असो वा अन्य कुठला कार्यक्रम. अशा कार्यक्रमांसाठी प्रत्येक जण हा नेहमीच उत्साही असतो. परंतु, अशाच कार्यक्रमांचा आधार घेऊन त्या गावात चक्क देशी गाईचे डोहाळजेवण घालण्यात आल्याने या जेवणाची जोरदार चर्चा पुरंदर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वीर धरणाच्या पलीकडे असणाऱ्या भादे गावात तानाजी शंकर चव्हाण व अनिता या शेतकरी दाम्पत्याने एका देशी गाईचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे.
त्यांनी तिचे नाव राधिका असे ठेवले आहे. आता या राधिकेच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी कळताच या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
त्यामुळे त्यांनी तिचे डोहाळजेवण करायचे ठरविले.
या अनोख्या कार्यक्रमाला सीझन वर्ल्ड उद्योगसमूहाचे संस्थापक योगेश कदम, भादे गावाच्या सरपंच मंगल साळुंखे, अण्णा कबुले, कल्पना चव्हाण, राख गावचे कैलास पवार, प्रशांत साळुंखे, सोनाली चव्हाण, लीलावती कदम, सुनीता शिंदे, रंजना चव्हाण, अहिल्या हिंगे, नीलिमा चव्हाण, लक्ष्मी शेलार, रूपाली पवार, कमोदिनी साळुंखे, जया चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.
ग्रामस्थांच्या मदतीने प्रतीकात्मक ओटी
मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या राधिका गाईला वस्त्रालंकार व फुलांच्या हारांनी सजवून या दाम्पत्याने महिला व ग्रामस्थांच्या मदतीने तिची प्रतीकात्मक ओटीदेखील भरली.
या वेळी महिलांनीदेखील डोहाळजेवणानिमित्त सदाबहार गाणी म्हणत वाजंत्रीवर्गालादेखील साथ देऊन या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली होती. या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त पुरणपोळीचे जेवण राधिकेला भरवून अनेकांनी तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.
पाहुण्यारावळ्यांसह गावातील महिला व ग्रामस्थांनी या डोहाळजेवणाचा मनमुराद आनंद लुटला. तर, या कार्यक्रमाला आसपासच्या गावांतील प्रतिष्ठित मान्यवरांनीदेखील आवर्जून हजेरी लावल्याने या कार्यक्रमाची रंगत आली होती.