देशी गायींच्या उपयुक्ततेबाबत मोशीत जनजागृतीपर प्रदर्शन अन् विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 04:18 PM2017-11-17T16:18:50+5:302017-11-17T16:34:32+5:30
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समितीच्या आवारात येत्या २ व ३ डिसेंबर रोजी देशी गायींची व्रिकी व प्रदर्शन आयोजित केले आहे.
पुणे : देशी गायीचे महत्त्व, शेण-गोमूत्र, दूध व दूधाचे उपपदार्थ याबाबत सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समितीच्या आवारात येत्या २ व ३ डिसेंबर रोजी देशी गायींची व्रिकी व प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच यावेळी तांदूळ महोत्सव देखील भरविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक भूषण तुपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव डॉ. पी. एल. खंडागळे उपस्थित होते.
याबाबत तुपे यांनी सांगितले, की देशी गायींच्या दूधापेक्षा तिच्या गोमूत्र आणि शेणांपासून तयार होणाऱ्या औषधांमुळे अनेक गंभीर आजार देखील बर होत असल्याचे संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. तसेच शेतीसाठी देखील घातक रासायनिक औषधे फोवरण्यापेक्षा या गायींच्या गोमूत्र व शेणापासून बनविलेल्या दशपर्णी, पंचामृत सर्व प्रकारच्या रोगराईवर उत्तम पर्याय असल्याचे देखील सिध्द झाले आहे. यामुळे देशी गायींबाबत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये गिर, खिलार, लालकंद आदी विविध जातीच्या सुमारे २०० ते २८० गायींच्या प्रजाती पहायला मिळणार आहेत. यामध्ये काही देशी वळू देखील आवर्जून प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहेत. यावेळी गाय, वळू यांची विक्री देखील करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट दूध देणारी व फायदेशीर गाय स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जातीमध्ये तीन क्रमांक काढून प्रत्येकी ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे तुपे यांनी स्पष्ट केले.
शहरांच्या विविध परिसरात तांदूळ महोत्सव
शहरातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून व खात्रीशर तांदूळ मिळण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शहराच्या विविध भागामध्ये तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. पहिला तांदूळ महोत्सव मोशी येथेच २ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यातील शेतकरी इंद्रायणी, आंबेमोहोर व अन्य स्थानिक तांदूळ विक्रीसाठी ठेवणार आहेत. तर २० ते २७ डिसेंबर दरम्यान मांजरी येथे हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती भूषण तुपे यांनी दिली.