तळजाई वसाहत परिसरात कोयत्याने दहशत पसरवली; तडीपार गुंडासह तिघांच्या मुसक्या आवळल्या
By नितीश गोवंडे | Updated: May 16, 2024 15:59 IST2024-05-16T15:59:00+5:302024-05-16T15:59:41+5:30
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या...

तळजाई वसाहत परिसरात कोयत्याने दहशत पसरवली; तडीपार गुंडासह तिघांच्या मुसक्या आवळल्या
पुणे : कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवण्याऱ्या तडीपार गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. बुधवारी (दि. १५) रात्री सव्वा बाराच्या सुमारास एका तडीपार गुन्हेगाराने व त्याच्या दोन साथीदारांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवली. ही घटना तळजाई वसाहत, पद्मावती येथे घडली.
याबाबत गुनाजी आण्णा वाघमारे (४३ रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजू संजय लोंडे उर्फ डड्या (२६), राज रवी वाघमारे उर्फ हीरव्या (१८, रा. दोघे रा. तळजाई वसाहत, पद्मावती) आणि सुशील गोरे (१८) यांच्यावर आर्म अॅक्टसह महाराष्ट्र पोलिस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. आरोपी राजू लोंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर राज वाघमारे याच्यावर ५ गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या वस्तीत आले. त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. त्यावेळी वस्तीमधील लोक जमा झाले असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवली. तसेच आमची पोलिसांकडे तक्रार केली तर वाघमारे कुटुंबाला जगू देणार नाही अशी धमकी देऊन हातातील कोयते हवेत फिरवून निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नलावडे करत आहेत.