दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय?
By अतुल चिंचली | Published: June 2, 2023 01:47 PM2023-06-02T13:47:21+5:302023-06-02T13:54:22+5:30
Maharashtra Board SSC Result 2023- शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता निकाल कसा दिसतो?
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra Board SSC Result 2023) इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले हाेते. शुक्रवारी (दि. २) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार असल्याचे शिक्षणमंडळाकडून सांगण्यात आले होते. परंतु एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल एक तास अगोदर १२ वाजल्यापासून पाहायला मिळू लागला. लोकमतने त्या वेबसाईटवर पाहणी केली असता हि माहिती समोर आली आहे. त्यावरून लोकमतच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांना विचारले असता त्यांनी हा निकाल फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
काही पालकांनी या वेबसाइटवरून निकाल काढले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी लोकमतने १ नंतर जाहीर होणाऱ्या निकालाबरोबर १२ ला दिसणाऱ्या निकालाची पडताळणी केली. दोन्ही निकाल सारखेच दिसून आले आहेत. मात्र त्यांची प्रिंट वेगळी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये मार्क आणि टक्केही सारखेच होते. शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल दिसतोच कसा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. याविषयाबाबत लोकमतने शरद गोसावी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या वेबसाईटवरील निकाल फेक असल्याचे सांगितले. पण अशा फेक निकालामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते का? याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश हाेता. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध हाेणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईल.
इथे पहा निकाल
१. www.mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://ssc.mahresults.org.in