दांडेकर पुलाचे चिरे ढासळताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:18+5:302021-08-14T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धोकादायक दांडेकर पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. पुलाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धोकादायक दांडेकर पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. पुलाचे चिरे ढासळत असून, त्यामुळे हा पूल कधीही खचू शकतो, असा दावा मनसेने केला.
मनसेच्या वतीने सध्या आंबिल ओढा पात्राची ओढ्याच्या कडेने चालत जाऊन पाहणी करण्यात येत आहे. दत्तवाडी येथील पाहणीत मामासाहेब दांडेकर पुलाच्या कमानीचे काही दगडी चिरे ढासळल्याचे आढळले, असे मनसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनी सांगितले.
काही चिरे ढासळले, पण पुलाच्या कमानीतील सगळे चिरे ढिले झालेत. त्यातील सिमेंट निघून गेले आहेत. पुलाखालील बाजूने इतका कमकुवत झाला आहे की, वरचा पदपथही अनेक ठिकाणी खचला आहे, अशी माहिती महेश महाले, योगेश खैरे, संतोष पाटील, धोंडीराम सरोदे यांनी दिली.
पुलावरून रोज जड वाहतूक सुरू असते. अनेक नागरिक दुचाकीवरून ये-जा करत असतात. त्यावरून जड वाहने गेली की पूल हादरतो. अपघात झाला की, जागे व्हायचे ही महापालिकेची परंपरा आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पुलाच्या मजबुतीची शास्त्रीय पाहणी करावी, त्या अहवालानुसार तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सातपुते यांनी दिला.