आजी-आजोबांसाठीही आता पाळणाघर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:39+5:302021-01-16T04:13:39+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : आई-वडील नोकरदार असतील आणि घरात त्यांना सांभाळणारं कोणीच नसल्यास उत्तम पर्याय असतो तो पाळणाघराचा! लहान ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : आई-वडील नोकरदार असतील आणि घरात त्यांना सांभाळणारं कोणीच नसल्यास उत्तम पर्याय असतो तो पाळणाघराचा! लहान मुलांच्या संगोपनासाठी, देखभालीसाठी, पालकांना पाळणाघरांचा मोठा आधार असतो. पुण्यात सध्या एक ‘विशेष पाळणाघर’ चर्चेचा विषय बनले आहे...आजी-आजोबांसाठी पाळणाघर! ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; मात्र, अनुराधा करकरे यांनी ज्येष्ठांच्या आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणे रंग भरण्यासाठी ‘रेनबो’ या संस्थेच्या माध्यमातून अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
आजकाल ज्येष्ठ नागरिकांची एकटेपणाची समस्या चिंतेचा विषय ठरली आहे. उमेदीचा काळ संपल्यावर आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठांना भावनिक आधाराची, सहवासाची नितांत गरज असते. बरेचदा मुले परदेशी असल्याने किंवा इतर काही कारणाने एकटेपणा छळतो. काहीजण जोडीदार निवर्तल्यामुळे एकटे पडलेले असतात. या सर्वांसाठी ‘आजी-आजोबांसाठी पाळणाघर’ या संकल्पनेने आशेचा किरण निर्माण केला आहे. घर आणि वृध्दाश्रम यांच्यामधला हा पर्याय आहे.
सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत संस्था ज्येष्ठांसाठी खुली असते. या वेळेत नाश्ता, वर्तमानपत्र, पुस्तक वाचन, प्रार्थना, गप्पा, समुपदेशन, योगा, प्राणायाम, दुपारचे जेवण, वामकुक्षी, चहापान असा भरगच्च कार्यक्रम असतो. डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, बुद्धीला चालना देणारे खेळ, लघुपट पाहणे, वादन, गायन असे उपक्रमही आयोजित केले जातात. वर्षातून दोनदा एकदिवसीय सहल असते. तात्पुरती राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माइंड जिम
‘डिप्लोमा इन काैंन्सेलिंग सायकोलॉजी’चा अभ्यास करताना सुचिता वाडेकर यांनी रेनबो या संस्थेच्या कार्याचा नुकताच आढावा घेतला. येथे ज्येष्ठांसाठी ‘माइंड जिम’ हा उपक्रम चालवला जातो. विविध कलांच्या माध्यमातून ‘स्व’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा यामागचा उद्देश आहे. आयुष्याचा उत्तरार्ध आनंदी, समाधानी जावा यासाठी आणि मेंदू व मनाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी याचा उपयोग होतो, असे सुचिता वाडेकर यांनी नमूद केले.
कोट
“आजी-आजोबांचा एकटेपणा कमी करत त्यांना ‘क्वालिटी टाइम’ व्यतीत करता यावा, यासाठी २०१५ साली संस्थेची स्थापना झाली. ज्येष्ठांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची १७ जणांची ‘टीम’ येथे काम करते.
- अनुराधा करकरे