जेजुरी रेल्वेस्थानकात पादचारी पुलाला क्रेन घासली : दोन महिला प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:57 PM2019-05-27T15:57:26+5:302019-05-27T16:05:36+5:30
पुलाला क्रेन एवढ्या जोरात घासली की संपूर्ण ओव्हरब्रीज उखडला आहे. शिवाय पुलाच्या खालच्या बाजूने असणारे सिमेंटचे स्लीपरचे तुकडे रेल्वे फलाटावर पडले.
पुणे (जेजुरी) :महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्यारेल्वे स्थानकात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलाला (ओव्हरब्रिज) क्रेन घासल्याने मोठा अपघात झाला. यावेळी पुलाला क्रेन एवढ्या जोरात घासली की संपूर्ण ओव्हरब्रीज उखडला आहे. शिवाय पुलाच्या खालच्या बाजूने असणारे सिमेंटचे स्लीपरचे तुकडे रेल्वे फलाटावर पडले. रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने कोयना एक्सप्रेस गाडीसाठी आलेले प्रवाशी या ओव्हरब्रीजच्या खाली सावलीत थांबले होते. ब्रीजचे तुकडे पडू लागल्याने प्रवाशांनी आरडा ओरडा करीत बाजूला धाव घेतली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मात्र देव दर्शनासाठी आलेल्या शीतल रोहित साळुंखे रा. लातूर व तनुजा सतीश वैरागळ, मुंबई अंबरनाथ या दोन प्रवासी महिलांना किरकोळ मार लागला आहे. रेल्वे स्थानकाचे दुरुस्तीचे काम सुरू असून फलाट क्रमांक 1 ची दुरुस्ती साठी पुण्याहून रेल्वेक्रेन मागवण्यात आली होती. फलाटाचे काम झाल्याने क्रेन पुण्याकडे जात होती. परंतु क्रेन ऑपरेटरने क्रेन खाली न घेताच तशीच उभी ठेवली होती. यामुळे साठी हा ब्रीज बंद करावा लागणार आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नसली तरी प्रवाशी संतप्त झाले होते. अपघातानंतर क्रेन ऑपरेटर व सुपरवायझर पळून गेले.
क्रेन ऑपरेटरच्या गलथानपणामुळे आज मोठी दुर्घटना घडली असती मात्र दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. झालेल्या अपघाताची संपूर्ण माहिती घेण्यात येत असून क्रेन ऑपरेटर विजय पाटील आणि सुपरवायझर उमेश वनखेडेकर यांना निलंबित करण्यात आल्याचे रेल्वे मास्तर गुजरमल मीना यांनी सांगितले.