पोटाची खळगी भरण्यासाठी महिला चालवितात क्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:58 PM2018-05-28T16:58:44+5:302018-05-28T16:58:44+5:30
विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहे.
चाकण : पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरीने कष्ट मोजत असतो. यात आत्ताच्या काळानुसार, महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने खांदा लावून पडेल ते काम करण्यात तत्परता दाखवत आहे. याच गोष्टीचा प्रत्यय तुम्हाला खान्देशातून विहीर खोदकाम करण्यासाठी चाकण येथे आलेल्या कुटुंबातील महिलांकडे पाहून येतो. कारण या कुटुंबातील काही महिला चक्क महिला क्रेन चालवित आहे.
विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहे. अनेक तरुणांनी चाकण औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्याही मिळवल्या आहे. तर अनेक कुटुंबे कष्टाचे काम करून आपला उदरनिर्वाह करतानाचे चित्र या परिसरात दिसत आहे.
कडाचीवाडी येथील माजी उपसरपंचाच्या विहीर खोदकाम सुरु असून या कामासाठी जळगाव जिल्ह्यातील जाधव व झाकणे ही दोन कुटुंब आपल्या मुलाबाळांसह आली आहे. त्यांनी शेतातच तंबू टाकून आपला संसार मांडला असून या कुटुंबातील महिला अक्षरश: उरा पोटावर दगड उचलून क्रेनमध्ये भरतात व महिलाच क्रेन चालवत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या महिलांचे कष्ट पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहे.
या घटनेने १९७२ च्या दुष्काळातल्या कामांचीच एकप्रकारे आठवण झाली. त्यावेळी देखील लोकांनी मिळेल ते काम करत कुटंबाचा उदरनिर्वाह केला. यातूनच खेड तालुक्यात सर्वाधिक विहिरी व पाझर तलाव खोदकामे झाली.
==================