प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा अन्नसाखळीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:29 AM2018-09-11T01:29:44+5:302018-09-11T01:29:57+5:30
प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा मानवी अन्नसाखळीत शिरकाव होऊ लागल्याने भविष्यात घरोघरी कर्करोगाचे रुग्ण असतील अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे;
- रविकिरण सासवडे
बारामती : प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा मानवी अन्नसाखळीत शिरकाव होऊ लागल्याने भविष्यात घरोघरी कर्करोगाचे रुग्ण असतील अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे; मात्र मातीच्या मूर्तींच्या किमती जास्त असल्याने ग्राहक मातीच्या मूर्ती घेण्यासाठी धजावत नसल्याचेही चित्र आहे. तसेच, मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांना भरपूर वेळ द्यावा लागत असल्याने, मातीच्या मूर्ती मागणीनुसारच तयार करून देण्यात येत आहेत.
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्ती कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कलाकारांची धांदल उडाली आहे. यंदादेखील पर्यावरण पूरक मूर्ती मागणीनुसार तयार करून देण्यात येत आहेत; मात्र शाडूमातीची एक मूर्ती तयार करण्यासाठी दोनतीन दिवसांचा वेळ द्यावा लागत असल्याने या मूर्तींची किमतही जास्त आहेत. सण-उत्सवांच्या काळात पर्यावरणाची काळजी घ्यावी, यासाठी शासनस्तरावरून आवाहन करण्यात येते. तसेच शाळा-महाविद्यालयांमधून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीपासून पर्यावरणाची होत असलेली हानी अधोरेखीत करण्यात येते.
यासंदर्भात, जनजागृती मोठ्याप्रमाणात होत आहे. ठिकठिकाणी पर्यावरण पूरक शाडूमातीच्या मूर्तीचे स्टॉलदेखील सजत आहेत. मात्र, या मूर्ती बनविण्यासाठी कलाकारांना वेळ द्यावा लागत आहे.
> प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. मूर्तीकारांनीही जास्तीत जास्त शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याची गरज आहे. अनेक मूर्तीकारांना शाडूमाती विकत घ्यावी लागते. ५० किलो मातीच्या पोत्यासाठी ४०० रुपये मोजावे लागतात. यामध्ये सरासरी ६ इंचाच्या २० व एका फुटाच्या ८ मूर्ती तयार होतात. किमती जास्त असल्या, तरी पर्यावरणाचे संवर्धन राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या जबाबदारीचे भान ग्राहकानेदेखील ठेवले पाहिजे. किंमत जास्त असली, तरी ग्राहकांनी त्या मूर्ती खरेदी केल्या तरच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
- दिलीप डेंगळे, अध्यक्ष, बारामती तालुका कुंभार समाज संघटना
>प्लॅस्टर आॅफ पॅरिस हे एक प्रकारचे सिमेंट आहे. उत्सवानंतर या मूर्ती पाणवठ्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. कोणत्याही प्रदूषणाचा प्रथम प्रभाव हा सूक्ष्मजीवांवर होतो.
हे सूक्ष्मजीव मारले जातात.
मानवाच्या अन्नसाखळीमध्ये पुढील काही वर्षांत प्लॅस्टर आॅफ पॅरिस जाणार आहे. वेगवेगळ्या रसायनांच्या माध्यमातून तयार झालेले प्लॅस्टर आॅफ पॅरिसमुळे मानवाला कॅन्सरसारख्या भयानक रोगाला सामोरे जावे लागेल. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकांनी आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे.
- डॉ. महेश गायकवाड,
पर्यावरणतज्ज्ञ
>कोणत्याही साच्याविना या मूर्तींची कलाकुसर घडवावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच या मूर्तींच्या किंमती वाढतात. सध्या बाजारात शाडूमातीच्या एक फुटाच्या गणेश मूर्तीची किंमत १ हजाराच्या पुढे आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून १०० मूर्ती बनविण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात शाडूमातीच्या केवळ १० मूर्ती बनवून तयार होतात. व्यवसायाची गणिते जमवताना शाडूमातीच्या मूर्तींच्या किंमती वाढतात.