‘फेसबुक’च्या वादातून हाणामारी
By admin | Published: March 27, 2017 03:33 AM2017-03-27T03:33:36+5:302017-03-27T03:33:36+5:30
‘फेसबुक’ पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादामधून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह
पुणे : ‘फेसबुक’ पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादामधून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुखसागरनगरमध्ये घडली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
नगरसेवक वसंत मोरे (वय ४३, रा. कृष्णलीला निवास, कात्रज) यांच्या फिर्यादीवरुन रवी एकनाथ संकपाळ (वय ४४, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर), राजाभाऊ कदम, राहुल कामठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपाच्या नगरसेविका आहेत. तर रवी संकपाळ यांच्या फिर्यादीवरून वसंत मोरे यांच्यासह बंडू सूर्यवंशी आणि मंगेश रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्यांचे मित्र सूर्यवंशी व रासकर हे सुखसागरनगर येथून जात होते. त्या वेळी त्यांनी संकपाळ यांना ‘तू विनाकारण माझ्या फेसबुकवर कमेंट का करीत असतोस’ अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी त्यांना मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सूर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण झाली.