आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकच्या जागांची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:18 PM2020-03-01T16:18:47+5:302020-03-01T16:22:47+5:30
प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी अनेक शाळांनी इयत्ता पहिली हाच ‘एन्ट्री पॉईंट’ ठेवला आहे. परिणामी पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांचे '' एन्ट्री पॉईंट '' तपासून घ्यावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक ९७२ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये यंदा आरटीई प्रवेशाच्या १७,०५३ जागा उपलब्ध आहेत. त्यातील सुमारे ९३ टक्के शाळांनी नर्सरी व केजीस्तरावरचे प्रवेश नाकारले आहेत. आरईटी प्रवेशाच्या एकूण १७,०५३ पैकी १५,६३८ जागांवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परिणामी ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शाळांमध्ये खूप कमी जागा उपलब्ध आहेत.
आरईटी प्रवेशाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांनी घराजवळील नर्सरी, केजी एन्ट्री पॉईंटच्या शाळांचा शोध घेतला. परंतु, अनेक पालकांना या शाळाच सापडल्या नाहीत. परिणामी ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच आरटीईच्या शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरता येत आहे. त्यामुळे वर्षभर आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्याच्या आशेने दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाल्याचा प्रवेश न केलेल्या पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. तसेच शाळांनी अचानक बदललेल्या ‘एन्ट्री पॉईंट’ची पालकांना कल्पना नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.
सामान्यपणे खुल्या प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे विद्यार्थी खासगी शाळांमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांचा बराच अभ्यास झालेला असतो. तसेच त्यांची काही कौशल्ये विकसित झालेली असतात. नर्सरीपासून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसोबत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बसवल्यास या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुले-मुली शैक्षणिक प्रगतीमध्ये मागे पडू शकतात.
------------------------
केवळ आर्थिक परतावा द्यावा लागू नये, म्हणून राज्य शासन शाळांचा आरटीई प्रवेशाचा एन्ट्री पॉर्इंट पहिलीपासून करण्यास मान्यता देत आहे. त्यामुळे गरीब पालकांना खासगी नर्सरी, केजी, शिशुवर्गात भरमसाठ पैसे भरून प्रवेश घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे नर्सरी, केजी वर्ग संलग्न असणाºया सर्व शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश द्यावा. अन्यथा शिक्षणमंत्र्यांनी ३ ते ५ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क लागू नसल्याचे जाहीर करावे.
- मुकुंद कीर्दत, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे
..........................
माझा मुलगा चार वर्षांचा असून त्याला आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी मी गेल्या वर्षापासून प्रयत्न करत आहे. परंतु, वडाचीवाडी या भागातील शाळांंनी आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकचे वर्गच दाखविले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. - सोनी राठोड, पालक, वडाचीवाडी
---------------